केदारनाथ धामचे कपाट विधी पूजनासह भाविकांसाठी खुले !

केदारनाथ : देवभूमी उत्तराखंड मधील केदारनाथ धामचे कपाट विधी पूजनासह आज शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. या सोहळ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देखील उपस्थित राहून सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या .ओम नमः शिवाय मंत्र आणि भाविकांच्या बम बम भोले या जयकारात सकाळी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.
गुरुवार एक मे रोजी बाबा केदार यांची पंचमुखी पालखी केदारनाथ धामला पोहोचली. केदारनाथचे दर्शन करण्यासाठी जवळपास 15 हजाराहून अधिक भावीक येथे दाखल झाले आहेत. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भक्तांनी हर हर महादेव च्या गर्जना देत परिसर दुमदुमून सोडला. केदारनाथ मंदिराचे कपाट उघडण्याच्या सोहळ्यासाठी मंदिराला 108 क्विंटल फुलांनी भव्यप्रकारे सुशोभित करण्यात आले होते. गुरुवार 01 मे रोजी राज्याचे डीजेपी दीपक शेठ आणि अप्पर पोलीस महासंचालक व्ही मुरुगेशन यांनी श्री बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम या ठिकाणी पाहणी करत सुरक्षा व्यवस्था आणि अन्य तयारीचा आढावा घेतला.

यंदा केदारनाथ यात्रेत गर्दीचे नियोजन करण्यासाठी टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडताच हेलिकॉप्टर मधून भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली केदारनाथ मंदिराच्या 30 मीटर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास बंदी करण्यात आली आहे.

