पिंपरी चिंचवड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली सेवा हक्क दिनानिमित्त शपथ!

सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम
पिंपरी : “आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, आम्ही महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी आम्हाला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी कटीबद्ध राहू. आम्ही सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक ती पावले उचलू तसेच आम्ही नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्कांचा आदर ठेवून व सेवा भाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करू ” अशा आशयाची शपथ आज महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज प्रशासकीय भवनात महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सेवा हक्का हक्काबाबत जागरूकता निर्माण व्हावी याकरिता महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकसेवा सेवा हक्काची शपथ घेतली.
यावेळी उप आयुक्त विठ्ठल जोशी, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी श्रद्धा बोर्डे, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, मुख्य लिपिक मोरे, अनिल कुऱ्हाडे यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्यात आज (२८ एप्रिल) रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सेवा हक्क दिन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या दशकपूर्ती निमित्त आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार प्रशासन सेवेत नागरी सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उपक्रमांमध्ये मुख्य प्रशासकीय कार्यालयांसह,क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर कार्यालयांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्त सेवेची बांधिलकी जपणूक करण्याची शपथ अधिकारी वर्गाना देण्यात आली . दरम्यान महापालिकांच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे आरोग्य विभागामार्फत गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रे येथे सेवा हक्क नियमांचे फलक घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील नागरिक भागांमध्ये पथनाट्याद्वारे सेवा तसेच समाज विकास विभागाच्या वतीने झोपडपट्टी व बचत गट यांच्यामध्ये समूह संघटकामार्फत सेवा हक्क अधिनियमाची माहिती देण्यासाठी मेळावे व बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महापालिका विविध विभागामार्फत एकूण 57 सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरी सुविधा केंद्रामार्फत सेवा देते. याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालय व मुख्य कार्यालयात तसे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महापालिका क्षेत्रातील कोणत्याही नागरी सुविधा केंद्रात नागरिक संपर्क करु शकतात.
लोकसेवा हक्क दिन साजरा करतांना आपण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा संकल्प करून आपल्या नागरिकांना सेवा देण्यासाठी सदैव तयार राहू. आजच्या लोकशाही सेवा हक्क दिनानिमित्त नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्याची शपथ घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला देशात नंबर एक बनवूयात.- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका