फँटॅस्टिक १५ पिंपरी-चिंचवड वुमेन्स लीगचा विजेता!

मालिकावीर जीनल वखारिया, सायली लांडगे बेस्ट बॅट्समन; राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजन
वाकड : राहुल कलाटे फाऊंडेशन आयोजित पिंपरी चिंचवड शहरातील ‘पिंपरी चिंचवड वुमेन्स प्रिमियर लीग २०२५’ या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामान्यात “फँटॅस्टिक १५” या संघाने फ्लॅमिंगो संघावर २९ धावांनी दणदणीत विजय मिळवून पिंपरी चिंचवड वुमेन्स प्रिमियर लीग-२०२५ किताबावर आपले नावं कोरले.
वाकड येथील माउंट लिटेरा स्कूलच्या प्रशस्त मैदानावर दिमाखदार बक्षिस वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी मुख्य आयोजक व माजी नगरसेवक राहुल कलाटे, श्री गुरुदत्त व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल कलाटे, ॲड अमर देशमुख, अजय तोडकर, मयुर चिंचोरे, अक्षय पाटील, सुरज भरगुडे आदी मान्यवरांसह सहभागी खेळाडू व शहरातील क्रिकेट शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्पर्धेच्या विविध श्रेणीतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अंतिम सामान्यात फँटॅस्टिक १५ संघाने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ८ षटकात ४ बळी गमावले. एकट्या सायली लांडगे यांनी २५ बॉलमध्ये केलेल्या ४० (३ षटकार, ३ चौकार) धावांच्या जोरावर ८५ धावांचे लक्ष त्यांनी दिले. प्रत्युत्तरात फ्लॅमिंगो संघाची लवकरच पडझड सुरु झाली. ६ बळीच्या मोबदल्यात केवळ ५६ धावावर त्यांचा डाव गडगडला. सायली लांडगे यांना वुमन ऑफ द मॅच किताबाने गौरवण्यात आले. यंदाच्या पर्वात तब्बल ५४ संघ सहभागी झाले होते एकुण २३० सामने खेळविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट संघ व खेळाडू
विजेते संघ : प्रथम: फँटॅस्टिक १५, द्वितीय: फ्लॅमिंगो, तृतीय: एमजी स्मॅशर्स, चतुर्थ: माईटी माविरिक्स, बेस्ट बॅट्समन: सायली लांडगे, बेस्ट बॉलर मानसी रत्नपारखी, बेस्ट फिल्डर: श्रद्धा हरसुलकर, मालिकावीर: जीनल वखारिया या खेळाडूंना व संघांना विविध किताबांनी तसेच रोख रक्कम, भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी राहुल कलाटे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.