३० जून पर्यंत संपूर्ण मालमत्ता कर ऑनलाईनभरल्यास मिळणार १०% सूट !

मालमत्ता कर संकलन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नियोजन
परी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता नेहमीप्रमाणे मालमत्ता कर सवलतीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार ८६३ मालमत्ता असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे.
नागरिकांना कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास ५ टक्के आणि तो ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरला तर अधिक ५ टक्के अशी एकूण १० टक्के सवलत मिळणार आहे. या सवलतीचा लाभ घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये ३ लाख ४९ हजार ८३८ मालमत्ताधारकांनी ४३५ कोटी मालमत्ता कर वेळेत भरला आहे. या सवलतींचा लाभ घेऊन मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपला कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वर नमूद कर सवलती व्यतिरिक्त महानगरपालिकेतर्फे करदात्यासाठी अन्य विविध सवलती जाहीर केल्या आहेत. महानगरपालिका हद्दीत महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगांना ५० टक्के व माजी सैनिकांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतींचा लाभ ३० जून २०२५ पर्यंत घेता येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
अशी आहे मालमत्ता कर सवलत योजना
- ३० जून २०२५ पर्यंत आगाऊ तसेच ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत
- फक्त महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेस ३० टक्के कर सवलत
- ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के सवलत
- ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत
- कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या निवासी मालमत्तांना सामान्य करात ५ ते १० टक्क्यांपर्यंत सवलत
- शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट सौर ऊर्जा यासंकल्पना राबवणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १०टक्क्यांपर्यंत सवलत
- शौर्य पदक धारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत
- सलग तीन वर्षे मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने २०२५-२६ या वर्षाकरिता मालमत्ता करामधील सवलत व सूट जाहीर केल्या आहेत. या मालमत्तांची बिले देखील ऑनलाइन जनरेट झाली आहेत. ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना किमानदहा टक्के सामान्य करावर सवलत मिळणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत कर भरून विविध कर सवलीतीचा लाभ घेता येणार असल्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आपला कर ३० जून पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरून या सवलतींचा लाभ घ्यावा. – शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
