विचार प्रबोधन पर्वातील चर्चासत्रातून समजले ‘सर्वव्यापी डॉ.बाबासाहेब आंबेडकर’!

विविध क्षेत्रातील कार्यावर विचारवंतांनी टाकला प्रकाश
पिंपरी : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान आहे. शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, जलतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ म्हणून देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. शिक्षण, कायदा, राजकारण, समाजकारण, अर्थ अशा विविध क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. ‘सर्वव्यापी’ असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे,’ असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व २०२५ च्या दुसऱ्या दिवशी (१२ एप्रिल) झालेल्या ‘सर्वव्यापी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावरील चर्चासत्रात विचारवंतांनी मांडले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार, राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पानपाटील, प्रसिद्धी विधिज्ञ ॲड.अंबादास बनसोडे हे विचारवंत सहभागी झाले होते. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
चर्चासत्रात बोलताना माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले की, 'भारतीय संविधान भारतातील १४४ कोटी लोकांना एकत्र बांधण्याचे काम करते. भारतीय संविधान म्हणजे प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान आहे. भारताला एक राष्ट्र म्हणून उभा करण्यात भारतीय संविधानाचा मोलाचा वाटा आहे. आधुनिक भारताचे पायाभरणी भारतीय संविधानाने केली आहे. पण भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी तब्बल १२ प्रयत्न झाले. संविधान बनवण्याचा पहिला प्रयत्न १८९५ मध्ये झाला होता. प्रत्यक्ष संविधान १९५० मध्ये अंमलात आले. याचाच अर्थ संविधान बनवण्याची प्रक्रिया ५५ वर्ष चालली होती. या प्रवासात सर्वात जास्त योगदान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले आहे. संविधान बनवण्याच्या तब्बल ९ प्रयत्नात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भरीव काम होते,' असेही डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले. यावेळी डॉ. जाधव यांनी भारतीय संविधान बनवण्याचे जे १२ प्रयत्न झाले, त्याची सविस्तर माहिती दिली.
ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी सांगितले की, ‘भारतीय संविधान आणि बुद्ध धम्म या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतीय संविधानाच्या माध्यमातून घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. भारतीय संविधान हे कधीच बदलता येणार नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे आपले भविष्य सुखकर करणारे आहे,’ असेही ॲड.लोखंडे म्हणाले. यावेळी भारताच्या राष्ट्रध्वजातील प्रत्येक रंगांचे महत्त्व देखील त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक ज.वि. पवार यांनी, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे,’ असे सांगतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या विविध चळवळींबाबत माहिती दिली.
प्रसिद्धी विधिज्ञ ॲड.अंबादास बनसोडे यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यायालयात लढलेल्या विविध खटल्यांची माहिती दिली. तसेच कायदेविषयक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची सविस्तर मांडणी ॲड.बनसोडे यांनी विविध उदाहरणे देत केली.
मिलिंद पानपाटील म्हणाले, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे फक्त भारतीय घटनेचे शिल्पकार नसून ते आधुनिक भारताचे देखील शिल्पकार आहेत. भारताला महासत्ता बनवण्यासाठी पायाभरणी करण्याचे काम डॉ.आंबेडकर यांनी केले,’ असे सांगतानाच पानपाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जलनीती यावर प्रकाश टाकला.
यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

विचारवंतांचा अनोखा सन्मान
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने परिसंवादामध्ये सहभागी झालेल्या विचारावंतांचा सन्मान कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. अनोख्या पध्दतीने करण्यात आलेल्या या सन्मानाने उपस्थितांची मने जिंकली.