फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील संत तुकोबारायांचे मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर!

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील संत तुकोबारायांचे मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर!

पिंपरी : संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचे भूषण ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे पार पडला. भाविकांच्या उदंड प्रतिसादात पार पडलेल्या सोहळ्यामुळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणाऱ्या भव्यदिव्य मंदिर निर्मितीस गती मिळाली आहे. भाविकांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे संत तुकोबारायांचे नागर शैलीतील महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

संत तुकाराम महाराजांची चिंतन भूमी म्हणून श्री क्षेत्र भंडारा डोंगराची ओळख आहे. या ठिकाणी तुकोबांना गाथा स्फुरली. इंद्रायणीच्या पाण्यावर तरंगली आणि लोकशिक्षणाच्या सागरात अखंड आणि अव्याहतपणे प्रवाहित राहिली. तुका आकाशाएवढा संकल्पना साकारण्यासाठी त्यांच्या कार्याला साजेसे भव्य आणि दिव्य मंदिर डोंगरावर साकार व्हावे, अशी सकल वारकरी संप्रदायाचे आणि भाविकांचे स्वप्न होते. त्यासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने पुढाकार घेतला. व २०१६ मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली.

स्थापत्यकलेची अलौकिक उदाहरणे असलेल्या गांधीनगरचे अक्षरधाम, अयोध्येतील श्रीराम मंदिर तसेच अमेरिकेतील हिंदू जैन मंदिर धर्तीवर मंदिराची उभारणी होण्याचे ध्येय ठेवण्यात आले. अभंगाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणाऱ्या तुकोबांविषयी काहीशी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने डोंगरावर मंदिर निर्मितीचा भव्य आराखडा तयार करण्यात आला. मंदिर उभारण्यासाठी वास्तुविशारद म्हणून पद्मश्री चंद्रकांत सोनपुरा , परेशभाई सोनपुरा यांची नियुक्ती करण्यात आली.

भव्य-दिव्य स्वरुपातील मंदिर उभारणीचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून आर्थिक हातभार लागला आहे. दानशूर व्यक्ती, वारकरी संप्रदाय, व्यावसायिक, उद्योजक यांच्या देणग्यांसोबतच, सामन्यातील सामान्य वारकऱ्यांनी, गोर गरीब शेतकऱ्यांनी इतकेच काय तर अनेक महिला मायमाऊलींनी पदरची, जमेल तितकी देणगी देऊन कामाला खऱ्या अर्थाने सढळ मदत केली व सदिच्छा दिल्या. सर्व सामान्य वारकऱ्यांच्या या आशीर्वादातून प्रेरणा घेऊन, मंदिराचे उर्वरित बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस समितीच्या सदस्यांचा आहे.

संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन वर्षाच्या माध्यमातून, मंदिर उभारणीला भरघोस मदत प्राप्त व्हावी, या उद्देशाने वारकऱ्यांचे श्रद्धास्थान, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली) यांनी भव्य पारायण सोहळा आयोजित करण्याची संकल्पना मांडली. त्याला शांतीब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर यांची खंबीर साथ आणि मौलिक आशीर्वाद दिले. तसेच महराष्ट्रातील अनेक नामांकित कीर्तनकारांच्या उपस्थितीत नऊ ते १७ मार्चच्या कालावधीत भव्य पारायण सोहळा यशस्वी झाला.

या कालावधीत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टद्वारे महाराजांच्या ७ किलोच्या चांदीच्या पादुकांची नव्याने निर्मिती, व संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते यथासांग प्राणप्रतिष्ठा व पूजा झाली. सोहळ्याची सुरुवात श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र भंडारा डोंगर अशा भव्य दिंडी सोहळ्याने करण्यात आली होती. दिंडीमुळे देहू ते भंडारा डोंगराच्या वाटेला जणू पंढरीच्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ३७५ टाळकरी, ३७५ विणेकरी, ३७५ ध्वजधारक, ३६५ कीर्तनकार, तसेच ३७५ तुळशी व कलश अशा भव्य स्वरूपात मिरवणूक पार पडली. दिंडीत सहभागी लाखो भाविकांच्या भक्तीमुळे व ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषात पंढरपूरच्या वारीसमान ह्या दिंडीला डोंगर पायथ्याशी झालेल्या, भव्य रिंगणामुळे अजूनच शोभा आली.

अखंड हरिनाम सप्ताहात लाखो भाविकांनी सहभाग व अन्नदानाचा आस्वाद घेतला. अन्नदानात प्रसिद्ध आमटी महोत्सव साजरा झाला. होळीच्या दिवशी ५ लाख पुरणपोळ्या तसेच आमटी, भजी, कुरडई असा महाप्रसाद मुळशी तालुक्यातील शेतकरी मायभगिनींनी पाठवला. तसेच बीजेच्या दिवशी जळगाव व धुळे तालुक्यातून ३ लाख मांड्यांचा महाप्रसाद आला. सप्ताहात रोजचे अन्नदान चुलीवर बनवले गेले व जिल्ह्याभरातून रोजच्या भाकऱ्या लाखोंच्या संख्येत आल्या.

काल्याच्या दिवशी देहू, वैकुंठगमन भूमी तसेच भंडारा, घोरावडेश्वर, भामचंद्र, येलवाडी येथील भगिरथी माता स्थान, इत्यादी पवित्र ठिकाणांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज, हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज, भंडारा डोंगर मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, देहू संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे उपस्थित होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्यातील अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप झाला. तुकोबांचे विचार मानवाच्या कल्याणासाठी सर्वदूर पोहचण्यास मदत झाली. भाविकांनी व भंडारा डोंगर ट्रस्ट समितीने छोट्या माउलींना मानपत्र प्रदान केले.

केवळ घोंगडी घेऊन आले व घोंगडी घेऊन गेले’ अश्या उक्ती प्रमाणे, छोटे माउली, निःस्वार्थी हेतूने ते आले व सेवाकार्य बजावून परत निघून गेले. जाता जाता, पुढे ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या समाधी सोहळ्या निमित्त होणाऱ्या सप्ताहासाठी ५ लाख, देहू संस्थानासाठी १ लाख, घोरावडेश्वर संस्थानासाठी १ लाख, भामचंद्र संस्थानासाठी १ लाख, परमपूज्य कुर्हेकर बाबांच्या आरोग्य खर्चासाठी १ लाख असा सर्व निधी सुपूर्त करून गेले. व अन्नदानातील उर्ववरीत किराणा, तसेच इतर साहित्य व निधी अशी २ कोटी पर्यंतची मदत त्यांनी भंडारा डोंगर समितीकडे सुपूर्द केली. या उपक्रमाचे संपूर्ण राज्यातच नव्हे तर जगभरात कौतुक झाले. निःस्वार्थी वृत्तीने व प्रचंड अभ्यासपूर्वक नेतृत्वातून छोट्या माउलींना पार पाडलेला असा हा सोहळा कायमच भाविकांच्या मनात राहिल.

धार्मिक पर्यटनाला चालना
श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर निर्माण होत असलेल्या तुकोबांच्या मंदिराविषयी वारकरी संप्रदायाला उत्सुकता आहे. या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा मिळून सशक्त भारत संकल्पनेला बळ मिळणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. देव, देश आणि धर्मासाठीची ही सेवा लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकार्पित व्हावी, हीच सदिच्छा आहे.
– ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माउली),मुख्य संयोजक गाथा पारायण सोहळा

पूर्ततेचा कळस व्हावा!
अभंगाच्या अविट गोडीतून संपूर्ण जगाला मानवतेची अमूल्य शिकवण देणाऱ्या संत तुकाराम महाराजांना ज्या डोंगरावर गाथा स्फुरली. त्या ठिकाणी त्यांचे भव्य मंदिर उभारण्याचे स्वप्न उराशी होते. भाविकांनी आणि दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली. त्यामुळे मंदिराची पायाभरणी होऊ शकली. महोत्सवाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज (छोटे माउली) यांचे मिळालेले अमूल्य सहकार्य व आशीर्वाद ह्यासाठी भंडारा डोंगर समिती कायमच ऋणी राहील. आता पूर्ततेचा कळस, व्हावा, हीच श्री भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे.
– बाळासाहेब काशिद (अध्यक्ष), श्री क्षेत्र भंडारा डोंगर दशमी सोहळा समिती

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"