नागरिकांच्या भेटीच्या वेळी गायब होणाऱ्या ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत नागरिकांचे हाल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवटीत नागरिक अनेक विभागांत कामे घेऊन येतात. मात्र, विभागातील अधिकारी जागेवर नसल्याने भेटत नव्हते. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी वेळ ठरवून दिली. मात्र, आता या भेटीच्या वेळेत बहुतांशी अधिकारी कार्यालयात नसतात. याबाबत आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाकडून अहवाल मागितला असून, भेटीच्या वेळी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या ३४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिकेचे कार्यालयीन कामकाज वेळेत विविध कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध कार्यालयांत, विविध अधिकाऱ्यांकडे येत असतात परंतु, अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ते साईटवर, बैठकीला किंवा कार्यक्रमाला असल्याचे कारण दिले जाते. याबाबत वारंवार तक्रारींमुळे आयुक्त सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी ३ ते सायंकाळी ६ ही वेळ निश्चित केली. त्यानुसार कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले.
विभाग प्रमुखांसह सर्वच अधिकाऱ्यांनी दालनाच्या दरवाजावर नागरिकांना भेटण्याच्या वेळेचे फलक लावले. पण, त्या वेळेतच अधिकारी उपस्थित नसतात. ही बाब लक्षात आल्याने आयुक्तांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सर्व कार्यालयांची पाहणी केली. त्यानुसार अहवाल आयुक्तांना दिला.
हे अधिकारी गैरहजर होते
पथकाने केलेल्या दहा दिवसांच्या तपासणीत सर्वाधिक चार दिवस लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, सहायक आयुक्त अमित पंडित गैरहजर आढळून आले. नंतर अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, सहायक आयुक्त तानाजी नरळे, उमेश ढाकणे, महेश वाघमोडे हे तीन दिवस जागेवर नव्हते. तर अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, उपायुक्त मनोज लोणकर, सचिन पवार, पंकज पाटील, अण्णा बोदडे, सीताराम बहुरे, राजेश आगळे, प्रदीप ठेंगल, सहशहर अभियंता संजय खाबडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे, सहायक आयुक्त अविनाश शिंदे, शीतल वाकडे, अजिंक्य येळे, विजय थोरात, मुकेश कोळप, सुचिना पानसरे, श्रीकांत कोळप, किशोर ननवरे, आयटीआय प्राचार्य शशिकांत पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांचाही एक-दोन वेळा भेटण्याच्या वेळी उपस्थित न राहणाऱ्यांमध्ये समावेश आहे.