वृक्षसंवर्धन विभागाचे ५७ कोटी ३६ लाख रुपयांचे सुधारित अंदाजपत्रकास मान्यता!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये मान्यता
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाचे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ५ कोटी ९ लाख रुपये शिल्लक रकमेसह आर्थिक वर्ष २०२५-२६ चे ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक आज स्थायी समिती व महापालिका सभेमध्ये सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाकडे वृक्षकर, वृक्षतोड लाकूड विक्री, अनुदान, देणगी, झाडतोड खर्च वसुली, रोपे विक्री, विनापरवाना झाडे तोडल्याबाबत नागरिकांकडून वसुल केलेली तडजोड रक्कम, महापालिका सेवा शुल्क आदी बाबींच्या माध्यमातून सुमारे ६२ कोटी ४६ लाख १० हजार ५०० रुपये जमा होणार आहेत. या जमा होणाऱ्या रकमेच्या शिल्लक रकमेसह २०२४-२५ चे सुधारित व २०२५-२६ च्या एकूण ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या मुळ अंदाजपत्रकास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
वृक्षसंवर्धन विभागाने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील रक्कम विविध उपक्रम, विकासकामांसाठी खर्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्चासह फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, झाडांचे पुर्नरोरपण करणे, पिंजरे खरेदी व दुरूस्ती करणे, वृक्षगणना करणे, तार कुंपण देखभाल दुरूस्ती करणे, विविध उद्यानांची देखभाल दुरूस्ती करणे, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षरोपण तसेच संवर्धन करणे, नर्सरी साहित्य खरेदी करणे आदी कामांचा समावेश आहे.
भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणे
याशिवाय, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्थेस अर्थसहाय्य देणे योजना राबविणे तसेच मौजे किवळे सर्वे नं. ८८ येथील अ. क्र. ४/१४५ येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान विकसित करणे, प्रभाग क्र. २० कासारवाडी येथील महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणे व अनुषंगिक कामे करणे, महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता या अभिनामाच्या मंजूर पदांच्या संख्येत १ ने वाढ करणे, चिखली परिसरातील मोरेवस्ती, म्हेत्रे वस्ती भागातील अरूंद रस्त्यांचे खडीकरण करून डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १ शेलारवस्ती, मोरेवस्ती, चिंचेचा मळा भागातील रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करणे आदींसाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.