फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म

धर्माविषयीचे तर्क-वितर्क थांबवा

धर्माविषयीचे तर्क-वितर्क थांबवा

ज्ञानेश्वर महाराज कदम यांना मानपत्र प्रदान; सर्व निधी भंडारा डोंगर समितीकडे सुपूर्द

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : आपल्या धर्माविषयी परंपरेविषयी कोणी विनाकारण तर्क कुतर्क करत असेल तर तो थांबविण्यासाठी आणि देवाच्या नाम साधनेचा आग्रह धरण्यासाठी भगवंताने आपल्याला जी वाचा दिली आहे, त्याचा वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) यांनी आज केले.

श्री जगद्गुरु  संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याची समाप्ती माऊली महाराज यांच्या कीर्तनाने झाली, त्यावेळी ते बोलत होते. काल्याच्या कीर्तनासाठी त्यांनी प्रेमाद्भुतसिंधू, कुळसागरइंदू,  कान्हाप्रिय बंधू, गुणातीत साधू जगद्गुरु तुकोबारायांचा गवळणीपर प्रकरणातील अभंग घेतला होता.

गोड लागे परी सांगतांचि न ये ।  बैसे मिठी सये आवडीची ॥१॥

वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मी हे माझीं अंगें हारपलीं ॥ध्रु.॥

परतेनि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेवलें मन ॥२॥

तुकयाच्या स्वामीसवें झाली भेटी । तेव्हां झाली तुटी मागिलाची ॥३॥

माऊली महाराज म्हणाले की, गोपिकांना भगवंताच्या दर्शनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या अनेक अनिर्वचनीय सुखाचे वर्णन करणारा अभंग आहे. भगवंताने आपल्याला जी वाचा दिली आहे, ती योग्य ठिकाणीच वापरली पाहिजे. जीवन जगत असताना काही प्रसंगी बोललंच पाहिजे असे तीन प्रसंग म्हणजे –  कोणी आपणाकडे निरोप दिला असेल तर तो वेळेत पोहोचवण्यासाठी बोललचे पाहिजे.

आपल्या धर्माविषयी, परंपरेविषयी कोणी विनाकारण तर्ककुतर्क करत असेल तर तो थांबवण्यासाठी आपण बोललंच पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे देवाच्या नामसाधनेचा आग्रह धरण्यासाठी बोललंच पाहिजे.

संत तुकाराम महाराजांनी आणि सर्वच संतांनी नाम साधनेचा महिमा गायला आहे. मात्र काही प्रसंगी आपण बोलू शकत नाही किंवा बोलूच नये. प्रेम सुद्धा शब्दात व्यक्त करता येत नाही आणि भगवंताच्या दर्शनाने होणारा आनंद, वाटणारे सुख, गोडवा सांगता येत नाही.

माऊली महाराज म्हणाले की, भगवंताचे दर्शन झाल्यानंतर गवळणी आपल्या मैत्रिणीला म्हणतात, सखे हरीचा भोग फार गोड वाटतो. परंतु तो भोग कसा आहे हे मात्र वाणीने सांगता येत नाही. मी त्या हरीला प्रेमाने मिठी मारून बसले आहे. त्या श्रीरंगाने आपल्या सुखभोगाचा छंद लावून माझे मन आकृष्ट केले आहे. मी हरीचा भोग घेते तेव्हा मी आणि माझे ही दोन संसाराची प्रमुख अंगे विसरली जातात. एकदा हरीच्या ठिकाणी दृष्टी जडली म्हणजे ती काही केल्या माघारी फिरत नाही माझे मन समाधानाला प्राप्त होऊन त्याच्या चरणी स्थिर झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा माझ्या स्वामी ची आणि गवळणी ची भेट झाली तेव्हा मागील संसाराचा संबंध नाहीसा झाला.

माऊली महाराज म्हणाले की, परमार्थात मी पणा येऊ देऊ नये. तो घातक असतो हे मूर्तिकाराच्या दृष्टांताच्या माध्यमातून महाराजांनी पटवून दिले. तुम्ही करा पण लोकांनी केलं असं सांगा.

कीर्तनाच्या उत्तरार्धात महाराजांनी भगवान कृष्णाचे चरित्र सांगितले. त्यांनी केलेल्या खोड्या, चौर्य कर्म विनोदी अंगाने सांगितले. गवळणींची घरच्यांच्या, सासू-सासर्‍यांचा त्रास सहन करून भगवंत भेटीची उत्कटता विविध प्रसंगातून सांगितली. मथुरेतील दही दूध इथल्या बाळ गोपाळांनाच मिळावे यासाठी विविध लीला केल्या. गोपाळांबरोबर गाई चारायला जाऊ लागल्यानंतर दुपारी सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून काला करायचा. हा काल्याचा प्रसाद देवांना ही दुर्लभ होता.

जे भाग्य गोपाळांना आणि गोपिकांना लाभले ते अन्य कोणाला लाभले नाही. श्रुती माऊलीच गोपिकांच्या रूपाने भगवंता बरोबर प्रकट झाल्या होत्या.

माऊली कदम यांना मानपत्र प्रदान
कीर्तनानंतर ज्ञानेश्वर महाराज कदम यांचा भव्य मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. माऊली कदम यांच्या शब्दाखातर गावोगावहून लोक य़ा सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. अनेकांनी मोठ्या प्रमाणावर दानही केले. त्याबदद्लची कृतज्ञता म्हणून हे मानपत्र देण्यात आले. मानपत्रामध्ये माऊलींनी केलेल्या वारकरी संप्रदायाच्या निस्पृह कार्याचा, भव्य दिव्य सप्ताहाचा गौरवाने उल्लेख केलेला होता. मानपत्राचे लेखन आदरणीय ढमाले माऊली यांनी केले होते. बिनभिंतीच्या शाळेतील कुलगुरू असे कदम माऊलींना संबोधले गेले. कदम माउलींच्या मातोश्रीही याप्रसंगी उपस्थित होत्या. तुकोबारायांची पगडी, उपरणे देऊन हा सन्मान करण्यात आला.

भंडारा डोंगर ट्रस्टकडे निधी स्वाधीन
यावेळी बिजेच्या दिवसापर्यंतचा १६ मार्च सायंकाळपर्यंतचा हिशेब सांगण्यात आला. यामध्ये जमा रक्कम दोन कोटी २५ लाख ८ हजार ४७६ इतकी आहे. एकूण खर्च एक कोटी पन्नास लाख ८९ हजार १८२ उर्वरित शिल्लक रक्कम ७४ लाख ४५ हजार २९४ तसेच माऊलींच्या पायावर जमा झालेली रक्कम पंचवीस हजार असे जवळजवळ एक कोटी रक्कम भंडारा डोंगर संस्थांनला, मंदिरासाठी देण्यात आली. विविध माध्यमातून सहकार्य केलेल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या भव्य दिव्य सप्ताहाची सोहळ्याची सांगता झाली. हा सर्व निधी भंडारा डोंगर ट्रस्टच्या स्वाधीन केला.  

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"