देहू ते भंडारा डोंगरापर्यंत उद्या दिंडी सोहळा

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवानिमित्त आयोजन
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याअंतर्गत उद्या शनिवारी (८ मार्च) दिंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाने गाथा पारायण सोहळा येत्या ९ मार्च ते १७ मार्च या कालावधीत होणार आहे. भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होईल. या पारायण सोहळ्यासाठी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जवळपास १०० एकर जागेवर हा सोहळा होणार आहे.
दिंडी सोहळा आणि वैशिष्ट्ये
या सोहळ्यानिमित्त उद्या दुपारी तीन वाजता श्री क्षेत्र भंडारा डोंगर भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिंडीमध्ये ३७५ धर्मध्वजधारी, ३७५ कलशधारी, ३७५ तुळशीधारी, ३७५ कीर्तनकार, ३७५ टाळकरी, ३७५ मृदंगसेवक ३७५ ब्रह्मवीणाधारी, ३७५ चोपदार यांचा समावेश असेल. दिंडीमध्ये पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. श्री क्षेत्र देहू येथून भंडारा डोंगरापर्यंत ही दिंडी निघणार आहे. तेथे पादुकांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. देहू पासून श्री क्षेत्र भंडारा डोंगरापर्यंत ही दिंडी निघणार आहे.
बीजेला तीन लाख मांडे होणार
तुकाराम बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे केले जाणार आहेत. मुळशीतील विविध गावांमधून पाच लाख पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. एक लाख भाकरी आणि विविध भागांमध्ये केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची आमटी येथे अन्नदानात उपलब्ध असेल. बीजेच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत वैकुंठ स्थानक, तुकाराम महाराजांचा वाडा, संस्थान देहू, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर, येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
आर्थिक मदत करू शकता..
येथे एक शीत दिधल्या अन्न। होय कोटी कुळाचे उद्धरण।
या सप्ताहामध्ये अन्नदान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यामुळे या अन्नदानाच्या पवित्र कार्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहकार्य करू शकतात. श्री जगद्गुरू तुकोबाराय परिचारक संस्था या नावाने पंजाब नॅशनल बँकेमध्ये असलेल्या खात्यावर मदत करता येईल. हा योग पुन्हा २५ वर्षांनीच येणार आहे. समस्त मावळ, मुळशी, खेड, हवेली, शिरुर, पुरंदर, भोर, वेल्हा, तालुके, पिंपरी चिंचवड तथा पुणे महानगर पालिकेतील गावे व नगरे, समस्त पुणे जिल्हा यांच्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.