फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

जागतिक पत उंचाविण्यासाठी सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल!

जागतिक पत उंचाविण्यासाठी सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवोद्गार
पिंपरी : जागतिक बाजारपेठेत भारताला तिसर्‍या क्रमांकावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने आयोजित केलेल्या सिनर्जी समिटसारख्या उपक्रमांनी चालना मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.

पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि जस्ट फॉर एन्टरप्रेनर (जे फॉर ई) यांच्या वतीने पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सिनर्जी समिटच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सेक्रेटरी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलगुरु प्रा. डॉ. एन. जे. पवार, जे फॉर ई संस्थेचे संस्थापक विशाल मेठी, बिजनेस सेलच्या प्रमुख अमृता देवगावकर, डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. संजीव चतुर्वेदी, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ग्लोबल स्कूलचे सल्लागार प्रा. सचिन वेर्णेकर आदी उपस्थित होते. 300 पेक्षा अधिक आंत्रप्रेनर्स आणि गुंतवणूकदारांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच, 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअप आयडियाचे सादरीकरण केले. त्यासाठी काही उद्योजकांनी आवश्यक गुंतवणूक करण्याची तयारीही दर्शविली आहे.

ज्यांनी उत्पादनाचे संशोधन केले आहे आणि ते बाजारपेठेत आणू इच्छितात त्यांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सिनर्जी समिटच्या माध्यमातून होत आहे, हे कौतुकास्पद आहे, असे सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले. नवनवीन कल्पनांवर संशोधन व्हावे, असे नमूद करून पाटील म्हणाले की, चांगल्या कल्पनांना बाजारपेठ मिळण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक बाजारपेठेत दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आणले आहे.. ज्या-ज्या देशांनी संशोधनाला चालना दिली त्या देशांनी जागतिक बाजारपेठेवर अधिराज्य केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी संशोधन आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांवर भर दिला आहे. संशोधनातून पुढे आलेल्या उत्पादनांना स्टार्टअप आणि स्टॅन्डअपच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली.त्यामुळे संशोधनाच्या आधारावर देशाने प्रगतीचा नवा मार्ग अवलंबला आहे. ध्येयाने काम करा. यशस्वी उद्योजक म्हणून जगात नाव कमवा. जगातून जेवढे कमवता येईल तेवढे कमवा. मात्र, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजासाठीही योगदान द्या, असे आवाहनही पाटील यांनी केले.

डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या की, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला मार्गदर्शन करत असतात. तसेच, त्यांचे कायमच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या चांगल्या उपक्रमांना पाठबळ असते. जागतिक पातळीवरील आव्हानांचा सामना करण्यासाठी या समिटच्या माध्यमातून काही नवीन संकल्पना मिळतील. विद्यार्थी आणि उद्योजक यांनी जीवनामध्ये येणार्या विविध आव्हानांचा सामना करताना स्वतःवर कायम विश्वास ठेवायला हवा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हीच धाडस केले पाहिजे. नवीन स्टार्टअप आणि उद्योजकांना सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि इनोव्हेशनला अनेकदा गुंतवणूकदार मिळत नाही. अशा वेळी त्यांनी निराश न होता प्रत्येक अपयशातून शिकत पुढे जात राहावे.

डीपीयूचे कुलगुरू प्रा. डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठाचे उपक्रम आणि विद्यापीठाने मिळविलेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचा 11 वा क्रमांक आणि डेंटल कॉलेजचा पाचवा क्रमांक आहे. विद्यापीठाला ग्रीन कॅम्पस पुरस्कारदेखील मिळालेला आहे. डॉ. सचिन वेर्णेकर यांनी आभार मानले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"