फक्त मुद्द्याचं!

20th April 2025
अध्यात्म

बुद्धिरूपी प्रकाश द्यावा देवा..

बुद्धिरूपी प्रकाश द्यावा देवा..

कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांचे प्रतिपादन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
देहू, ता. ३ : समाजात आपल्या आजूबाजूला  शास्त्राप्रमाणे आणि वेदाप्रमाणे वागणारे लोक कमी झाले आहेत. शब्द ज्ञान कमी असूनही खूप मोठा ज्ञानी असल्याचे अनेकजण भासवतात. त्यामुळे बुद्धिरूपी प्रकाश देण्याची प्रार्थना ईश्वराकडे करा, असे प्रतिपादन कीर्तनकार यशोधन महाराज साखरे यांनी भंडारा डोंगर येथे केले.  

श्री विठ्ठल रुखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने माघ शुद्ध दशमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात ते बोलत होते. वंसत पंचमी म्हणजे संत तुकाराम महाराज जन्म दिवस. या दिवसापासून भंडारा डोंगरावर येत्या १२ तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि किर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या किर्तन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी यशोधन महाराज बोलत होते.

तुकोबांनी आपल्या अभंगवाणीतून सन्मार्ग स्वच्छ केला. तो स्वच्छ ठेवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. बुद्धिरुपी प्रकाश पडू द्या. मालिन्य होवू नये अशी बुद्धी द्यावी, असे मागणे मागण्याचे आवाहन त्यांनी केले.  

उजळावया आलो वाटा | खरा खोटा निवाडा||
बोलविले बोले बोल | धनी विठ्ठल सन्निध ||
तरी मनी नाही शंका | बळे एका स्वामींच्या||
तुका म्हणे नयें आम्हां | पुढे कामा गाबाळ||

या अभंगावर यशोधन महाराज साखरे यांचे किर्तन झाले. यशोधन महाराज साखरे म्हणाले की, वसंत पंचमी हा संत तुकाराम महाराज यांचा जन्म दिवस आहे. तर माघ शुद्ध दशमी म्हणजे शुक्रवार(ता.७) हा सद्गुरु बोध दिवस आहे. त्यामुळे तुकोबा हे द्वीज आहे. भगवंत अवतार घेतात. ते केवळ भक्ताचे रक्षण करतात. तर संत स्वच्छेने जन्म घेतात. त्यामुळे अखंड समाजाला सतमार्ग आणि सनमार्ग मिळतो. तुकोबांनी आपल्या अभंगात उजळावया आलो वाटा असे सांगितले आहे. तसेच खरे खोट्याचा निवाडा करण्यासाठी आलो आहे, असे म्हणतात.

सन्मार्गावर मलीन झाल्याची विविध कारणे ते सांगतात. त्यातील पहिले अर्थ लोपली पुराणे म्हणजे पुराणाचे अर्थ लोप पावले. शास्त्राप्रमाणे आणि वेदाप्रमाणे वागणारे लोक कमी झाले आहेत. शब्द ज्ञान कमी असुनही खूप मोठा ज्ञानी असल्याचे अनेकजण भासवतात. शब्द ज्ञानालाच पूर्ण ज्ञान समजू लागल्याने चैतन्य आणि अंतरंग यातील फरक न समजू शकलेल्यामुळे वाट बिकट झाली आहे. तसेच विषय लोभाने साधनेही बुडविली गेली. त्यामुळे सन्मार्गावर मालिनता आली आहे. ही मलिनता दूर विवेकाने दूर करावे असे तुकोबा म्हणतात. मलिनता दूर करण्यासाठी आपल्या मागे ह्दयात बसलेल्या विठोबाचे बळ आहे.

दरम्यान, वसंतपंचमीच्या निमित्ताने पानेगावकर महाराजांनी तुकोबारायांचा पाळणा गीत गायले. तसेच यामध्ये उत्स्फूर्तरीत्या महिला श्रोत्यांनी साथ दिली. जन्मोत्सव संपन्न झाल्यानंतर उपस्थित सर्व श्रोत्यांना सुंठवडा देण्यात आला.

श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु असलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याच्या’ निमित्ताने ‘संत तुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित चिंतनाचा कार्यक्रम या सप्ताहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, संत, महात्मा कुठेही जन्माला येत नाहीत. पवित्र ते कुळ पावन तो देश | तेथे हरीचे दास जन्म घेती || पावनकुळातच संत जन्माला येतात, अवतार घेतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगांचा परिणाम दगडांवर देखील झाला. आजही म्हातारी माणसे या श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरती महाराजांच्या दर्शनासाठी येत असताना या डोंगराची माती आपल्या कपाळाला लावतात आणि धन्यता मानतात. संत आपल्या जीवन आचरणातून अनेक सामान्य जनांचे कल्याण करतात. संत तुकोबारायांनी आखून दिलेल्या परमार्थिक मार्गाने जीवन जगण्याची कृपा आपल्याला भाग्यानेच लाभत आहे. संसार हा डोक्यामध्ये ठेवायचा आणि परमार्थ अंत:करणामध्ये साठवायचा असे महाराजांनी आपल्या चिंतनातून नमूद केले.  हभप डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"