भंडारा डोंगरावर आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आजपासून (२ फेब्रुवारी) सप्ताहाला प्रारंभ होत आहे.
भंडारा डोंगरावर होणाऱ्या या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता आणि दुपारी दोन वाजता गाथा पारायण, सायंकाळी चार वाजता प्रवचन, सहा वाजता हरिपाठ, रात्री आठ वाजता कीर्तन होणार आहे. आणि रात्री अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत सार्वजनिक जागर होईल.
सप्ताहांतर्गत दोन फेब्रुवारी पासून रोज रात्री आठ ते दहा या वेळेत यशोधन महाराज साखरे, अॅड. जयवंत महाराज बोधले (ता. ३), उद्धव महाराज मंडलिक (ता. ४), सद्गुरू चैतन्य महाराज देगलूरकर (ता. ५), श्रीगुरू एकनाथ आबा वासकर महाराज (ता. ६), न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री (ता. ७), वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम (ता. ८) आणि डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन रविवारी (ता. ९) होणार आहे.
शुक्रवारी (ता.७) दुपारी बारा वाजता सन्मिताताई शिंदे यांचा तुका आकाशा एवढा हा संगीतमय कार्यक्रम होईल. त्यानंतर दीड वाजता डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने बहुरूपी भारूड सादर होईल. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे याचे सादरीकरण करतील.