ममताने का निवडला किन्नर आखाडा?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने महाकुंभ मेळ्यात येऊन किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. मात्र, ममता कुलकर्णीने किन्नर आखाडाच का निवडला याची चर्चा सुरू आहे.
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने एकेकाळी बॉलिवूड गाजवल्यानंतर ती अचानक इंडस्ट्रीपासून दूर गेली. त्यानंतर अंडरवर्ल्ड आणि ड्रग्ज माफियांशी तिचे नाव जोडले गेले. तिच्याबरोबर चर्चेत आलेली अनेक नाती तिने नाकारली देखील. गेल्या अनेक वर्षांपासून ममता भारताबाहेरच राहत होती. मात्र, आता महाकुंभच्या निमित्ताने ती भारतात परतली. भारतात परतल्यानंतर महाकुंभ मेळ्यात ममताने संन्यास घेतला आहे. तिने महाकुंभ २०२५ दरम्यान संन्यास घेतला आहे. महाकुंभमध्ये किन्नर आखाड्याकडून तिने दीक्षा मिळविली आहे. २५ जानेवारी रोजी ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. शुक्रवारी प्रयागराजमधील संगमध्ये तिने स्वत:चं पिंडदान केलं. त्याचठिकाणी तिचा पट्टाभिषेक पार पडला. आता ममता कुलकर्णीला नवीन नावंही मिळालं असून ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार.
का निवडला किन्नर आखाडा?
ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नर आखाडाच का निवडला, असा प्रश्न सातत्याने पुढे येत आहे. तिने हा आखाडा निवडल्यामुळे आखाडा परिषदेतूनच अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या मागचं कारण म्हणजे किन्नर आखाडा हा सनातन धर्माच्या १३ प्रमुख आखाड्यांपेक्षा वेगळा आहे. किन्नर आखाड्यामध्ये संन्यासी बनल्यानंतरसुद्धा त्या संबंधित व्यक्तीला तिचं भौतिक आयुष्य जगता येतं. यामध्ये महामंडलेश्वर बनण्यासाठी संसार आणि कौटुंबिक नातेसंबंध तोडण्याची गरज नसते.
का चर्चेत होती ममता कुलकर्णी?
ममता कुलकर्णी तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. १९९३ मध्ये अभिनेत्रीने स्टारडस्ट मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट केले होते. हे मासिकाचे प्रकाशित होताच बर्यापैकी खळबळ उडाली होती. यानंतर तिला १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. ममताबद्दल असं नेहमीच म्हटलं जात होतं की, तिने विकी गोस्वामी या अंडरवर्ल्ड ड्रग माफियाशी लग्न केलं. परंतु, अभिनेत्रीने याचा कधी उल्लेख केला नाही आणि नेहमीच ती केवळ एक अफवा असल्याचं म्हटलं गेलं. असं म्हणतात की ममता विकीसोबत १० वर्षे दुबईत राहत होती. त्याचबरोबर असंही म्हटलं जात होतं की, तिने तिच्या पतीसह मिळून अनेक बेकायदेशीर कामंही केली.