अवैध सावकारांवर कडक कारवाई करा : आयुक्त विनयकुमार चौबे

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास आली आहेत. अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी अवैध सावकारांवर कडक कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
गेल्या १५ दिवसांत खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरात आत्महत्येच्या दोन घडल्या आहेत. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गल्लोगल्ली खासगी सावकार असताना गेल्या सात वर्षांत केवळ चारच गुन्हे दाखल आहेत. खासगी सावकारांसोबतच फायनान्स कंपन्यांचे एजंटही कर्जदाराला दमदाटी व मारहाण करतात. त्यातूनच आत्महत्या सारखे प्रकार वाढू लागले आहेत.
महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी गुन्हेगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी असणारा विशेष कायदा ‘महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४’ हा अंमलात आणला आहे. अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरीकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे म्हणून जनजागृती मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच नागरीकांकडून भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे, नागरीकांचा छळ करणे, त्यांना धमक्या देणा-या सावकारांविरुद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करुन कोणी फसवणूक करत असेल, तसेच धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तात्काळ पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी केले आहे.