फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

१ लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक ४१८ मालमत्ता जप्त!

१ लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या व्यावसायिक ४१८ मालमत्ता जप्त!

हॉटेल, मॉल पेट्रोल पंप, चित्रपटगृहे,मंगल कार्यालये, कारखाने, खासगी रुग्णालये रडारवर
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून एक लाखाहून जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता तात्काळ जप्त करण्याचे आदेश संबधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, करसंकलन विभागाने दिनांक ७ जानेवारीपर्यंत तब्बल ४१८ मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांच्याकडे तब्बल ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे.

मालमत्ता जप्ती कारवाईवेळी १५११ मालमत्तांनी आपल्या थकीत कराचा भरणा करुन, २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ इतक्या कराचा भरणा केलेला आहे. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करुन देखील कराचा भरणा केला नसेल अशा मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलावीत असेही आदेश करसंकलन मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयास देण्यात आले आहेत. शहरातील एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्यांमध्ये खासगी संस्था, खासगी महावि‌द्यालये व शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औ‌द्योगिक कारखाने, शोरुम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृहे आदी आस्थापनांचा समावेश आहे. सदर थकबाकी असणाऱ्याआस्थापनांची यादी करसंकलन विभागाकडून तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयास कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. याचबरोबर अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाणार आहे. त्याचबरोबर अशा थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी सदर आस्थापनांच्या बाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. याबरोबर सदर मालमत्तांवर चालू स्थितीमध्ये सुध्दा जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाकडून देण्यात आले असून शहरामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई
करण्यात येत आहे.

शहरातील थकबाकीदारांना वारंवार कर भरण्याचे आवाहन करण्यात आले असून एक लाखाहून जास्त रक्कम थकीत असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार जप्तीची कारवाई
करण्यात येत आहे. शहरातील बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्यात येत असून मालमत्ताधारकांनी आपल्या थकीत कराचा तात्काळ भरणा करुन जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (१), प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"