फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

राम सुतार घडवणार छत्रपतींचा नवा पुतळा

राम सुतार घडवणार छत्रपतींचा नवा पुतळा

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या ६० फुटी पुतळ्याचे राज्य सरकारकडून कंत्राट

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभारण्याचे कंत्राट महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या कंपनीला दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील किल्ल्यावर महाराजांचा ३५ फूट पुतळ्याचे अनावरण मागच्या वर्षी चार डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे, २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचे श्रद्धास्थान असताना त्यांच्या पुतळ्याच्या कामाबाबत झालेला हलगर्जीपणा सरकारला भोवला होता. विरोधकांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. आता याच ठिकाणी छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला हे काम देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने यापूर्वी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. पीटीआयशी बोलताना अनिल सुतार यांनी सांगितले की, छत्रपतींचा नवीन पुतळा ब्राँझपासून बनवलेला आहे. त्या नवीन पुतळ्याची उंची ६० फूट असेल. तसेच ८ मिमी जाडीचा हा पुतळा तयार करण्यात येईल. तीन मीटर उंचीचा चौथरा तयार करून त्यावर हा पुतळा ठेवणअयात येईल. १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधला जावा, अशी निविदेत अट घालण्यात आली होती. मुख्य पुतळा उभारण्यापूर्वी तीन फूट उंचीचे मॉडेल तयार करण्यात येणार आहे. त्यांतर कला संचालनालयाची मान्यता घेऊनच पुढील प्रत्यक्ष काम हाती घेतले जाईल.

(संदर्भ : पीटीआय)

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"