फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

दिव्यांग बांधवांसाठी जानेवरीत पर्पल जल्लोष

दिव्यांग बांधवांसाठी जानेवरीत पर्पल जल्लोष

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : दिव्यांग बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी १७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत पर्पल जल्लोष म्हणजेच जल्लोष दिव्यांगत्वाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मानव कांबळे, दत्ता भोसले, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी, परशुराम बसवा, जनार्दन कोळसे, शंकर सोळसे या वेळी उपस्थित होते.

आयुक्त सिंह म्हणाले की, महापालिकेने दिव्यांग बांधवांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी दिव्यांग भवन उभारले आहे. या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करून अधिक दर्जेदार सुविधा पुरविण्यावर भर देत आहे. सहा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांचे अपंगत्व ओळखून त्यावर तज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार करण्याची आवश्यकता आहे.

प्रास्ताविकपर मनोगतात सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट म्हणाले, समाजविकास विभागाने दिव्यांग नागरिकांकरिता सामूहिक विवाह सोहळा तसेच दिव्यांग बांधवांना फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देणे या दोन अभिनव योजना यावर्षी राबविल्या आहेत.

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यांग बांधवांचा या वेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये अभिजित मुरुगकर, कविता मुरुगकर, राजेंद्र वाघचौरे, वैष्णवी जगताप, संकल्प बोत्रे, विजय कुदळे, मिलिंद सावंत, दिवांजी चावला, सोनाली वाघ, रानु कुलश्रेष्ठ, सैफुल हक, निकिता गुल्हाने तसेच नंदनवन, प्रहार, ब्रह्मदत्त, पताशीबाई रतनचंद मानव ट्रस्ट, अभिराज फाउंडेशन, घरकुल अपंग सहाय्य, पिंपरी-चिंचवड कर्णबधिर असोसिएशन या संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

दिव्यांगांसाठी विशेष अॅप्लिकेशन
दिव्यांगांना एका क्लिकवर सुविधांचा लाभ मिळण्यासाठी विशेष अॅपची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दिव्यांग बांधवांसाठी स्मार्टकार्ड तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली. दिव्यांग बांधवांसाठी विशेष अॅप आणि स्मार्ट कार्डच्या माध्यमातून विविध प्रकारच्या थेरपी, उपचार आणि त्यांची वैयक्तिक आवश्यक माहिती संग्रहीत करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना सहजपणे सुविधांचा लाभ घेता येईल. त्यासाठी शहरातील दिव्यांग बांधवांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले.

चिंचवड येथील मूक-बधीर विद्यालयातील सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. भोसरीतील अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. भाग्यश्री मोरे, संगिता जोशी यांनी व्हिलचेअरवर नृत्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. पौर्णिमा भोर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल शेडगे यांनी आभार मानले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"