फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
पिंपरी-चिंचवड

चिंचवड विधानसभा मतमोजणीच्या २४ फेऱ्या होणार!

चिंचवड विधानसभा मतमोजणीच्या २४ फेऱ्या होणार!

चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पाडणार आहे. या मतमोजणीसाठी २९ टेबल लावण्यात येणार असून २४ फेऱ्या होणार आहेत. उमेदवारांनी टेबलनिहाय मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी. नेमणूक करण्यात आलेल्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ओळखपत्र देण्यात येतील. तसेच वैध्य ओळखपत्राशिवाय कोणासही मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या.
तदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांच्या विशेष उपस्थितीत उमेदवार, प्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे पार पडलेल्या या बैठकीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच संबंधित कक्षांचे समन्वय अधिकारी आणि उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते.

मतमोजणीसाठी एकूण २९ टेबल लावण्यात येणार असून २४ फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये ईव्हीएम, टपाली आणि ईटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) अनुक्रमे २४, ४, १ टेबल लावण्यात येणार आहेत. निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी यावेळी दिली.

यावेळी उपस्थित उमेदवार प्रतिनिधींना मॉक पोल तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यामुळे बदलण्यात आलेल्या मतदान यंत्रांच्या माहितीची प्रत देण्यात आली. दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण ५८.३९ टक्के मतदान झाले असून ३ लाख ८७ हजार ५२० मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये २ लाख ३ हजार ७८१ पुरूष तर १ लाख ८३ हजार ७२४ महिला आणि १५ इतर मतदारांचा समावेश आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"