कुदळवाडीत ९६ एकर जागेवरील ८०६ अनधिकृत पत्राशेड, भंगार दुकाने ‘जमीनदोस्त’!

सलग चौथ्या दिवशीही महापालिकेची कारवाई सुरूच
पिंपरी : चिखली येथील कुदळवाडी भागात ९६ एकर भूभागावरील सुमारे ४१ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ८०६ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सलग चौथ्या दिवशी सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांचा समावेश होता.
शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि धडक कारवाई पथकांमार्फत कुदळवाडी येथे ८ फेब्रुवारी २०२५ पासून अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई करण्यात येत असून आज कारवाईचा चौथा दिवस होता.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमध्ये आज अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपआयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, सुचेता पानसरे, अमित पंडित, किशोर ननवरे, महेश वाघमोडे, अजिंक्य येळे, शितल वाकडे, श्रीकांत कोळप यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, संदीप डोईफोडे, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा
अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. १६ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या आहेत. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
आज अखेरपर्यंत सुमारे २ हजार ३१७ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई
महापालिकेच्या वतीने कुदळवाडी येथे सुरू असलेल्या या निष्कासनाच्या कारवाईमध्ये आज अखेरपर्यंत सुमारे १६१ लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकूण २ हजार ३१७ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे ३७२ एकर भूभागावर ही कारवाई करण्यात आली असून यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.