फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

पिंपरी- चिंचवड मध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

पिंपरी- चिंचवड मध्ये ३५० विद्यार्थ्यांना विषबाधा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेत साडेतीनशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर घटनेनंतर शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळल्यासारखं झाल्याने काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं.

पिंपरी-चिंचवडमध्ये शाहू नगर येथील डी. वाय. पाटील शाळेतील साडेतीनशे मुलांना ब्रेड आणि चटणी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शाळा प्रशासनाबद्दल पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळेत आज अल्पोपहार ठेवण्यात आला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी हा मेनू देण्यात आला. अल्पोपहार घेतल्यानंतर काही मिनिटांतच विद्यार्थ्यांना उलटी, मळमळल्यासारखं व्हायला लागलं, काही विद्यार्थ्यांना भोवळ आली, त्यामुळे तातडीने काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आलं. यावेळी शाळेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

शाळेत आज अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. ३०० ते ३५० मुलांना विषबाधा झाली आहे, ही गंभीर घटना आहे; आम्ही सर्व पालकांची माफी मागतो. हॉस्पिटलमध्ये मुलांना नेण्यात आलं आहे. खाण्याचं जे काही साहित्य आणलं आहे, त्याची टेस्ट करणार आहोत. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खायला दिलं आहे. ही शाळा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल असे डी.वाय. पाटील शाळा संचालक, अभय खोतकर यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"