पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चा १२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

पिंपरी : पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चा १२ वा वर्धापन दिन दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सायन्स फिल्म शो, विज्ञान प्रश्न मंजुषा, विद्यार्थ्यांसाठी कृतिशील विज्ञान कार्यशाळा आयोजित करण्यात आली व सायंकाळी आकाश दर्शनाचा आनंद प्रेक्षकांनी घेतला. हे सर्व कार्यक्रम प्रेक्षक व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
सायंकाळी ५.०० वाजता समारोप कार्यक्रमात शिवप्रसाद खेनद, निवृत्त संचालक, नेहरु विज्ञान केंद्र, मुंबई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री खेनद यांनी सायन्स पार्क च्या एकंदरीत १२ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. सायन्स पार्क स्थापने पासून सुमारे २५ लक्ष प्रेक्षक व विद्यार्थ्यांनी सायन्स पार्क ला भेट दिली असुन ही संख्या देशातील इतर विज्ञान केंद्राच्या तुलनेत चांगली आहे असेही ते म्हणाले. प्रास्ताविक व सायन्स पार्क च्या स्थापने पासूनची वाटचाल संचालक श्री प्रवीण तुपे यांनी विशद केली.
सायन्स पार्क येथे पुढील कालावधीत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संवर्धित वास्तव या विषयावर आधारित नविन दालने प्रेक्षकांसाठी उपलब्ध होत आहेत असे श्री प्रवीण तुपे यांनी जाहीर केले. तसेच या प्रसंगी सायन्स पार्क च्या मागील १२ वर्षातील यशस्वी वाटचाली मध्ये मोलाची भूमिका बजावल्याबद्दल विद्यमान संचालक मंडळाचा संस्थापक-संचालक श्री प्रवीण तुपे यांचे हस्ते सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सायन्स पार्क चे ज्येष्ठ संचालक श्री अरविंद नातू, श्री अरुणकुमार सिन्हा, श्रीमती संस्कृती मेनन, नेहरू विज्ञान केंद्र मुंबई चे संचालक श्री उमेश कुमार रूस्तोगी इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नंदकुमार कासार यांनी केले. सूत्र संचालन श्रीमती मोनाली डिंगर यांनी केले, आभार श्री सुनिल पोटे यांनी मानले.