डिलिव्हरी बॉयच्या टोळक्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पुनावळे येथील पुना व्हिले सोसायटीत शनिवारी झेप्टो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला हाउसिंग सोसायटीतील पॅसेंजर लिफ्टऐवजी सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. त्यावरून डिलिव्हरी बॉयसह १५ ते २० जणांच्या टोळक्याने सुरक्षारक्षकावर हल्ला केला. तसेच तिघांना मारहाण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती परसराम वरडे, केदार बनसोडे, सुहास महेंद्र शिंदे, गाेपाल सिद्धेश्वर बोरुडे, पृथ्वी पांडुरंग कांबळे, प्रियांश सिंग तोमर, रज्जाक खान, सुनील गवळी, राहुल गोपाळ बोरवडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासह त्यांच्या १४ ते १५ साथीदारांच्या विरोधात पेालिसांनी गुन्हा दाखल केला. मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी (२७, रा. पुनावळे, मूळगाव जम्मू काश्मीर) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी अश्रफ पुना व्हिले सोसायटीत सुरक्षारक्षक आहेत. सोसायटीत झेप्टो कंपनीचा डिलेव्हरी ब़ॉय मारुती वरडे आला. फिर्यादी अश्रफ यांनी मारुती याला पॅसेंजर लिफ्टऐवजी सर्व्हिस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. त्यामुळे मारुती चिडला. ‘‘तुम रुको और देखना हम क्या करते है’’, अशी धमकी देऊन तो निघून गेला. त्यानंतर काही वेळाने झेप्टो कंपनीचे डिलेव्हरी बाॅय असलेल्या त्याच्या १५ ते २० साथीदारांना तो घेऊन आला. ‘‘आज याला संपवूनच टाकतो’’, असे मारुती म्हणाला. मारुती आणि त्याचा साथीदार केदार बनसोडे या दोघांनी फिर्यादी अश्रफ यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात अश्रफ गंभीर जखमी झाले. फिर्यादी अश्रफ यांचे सुपरवायजर प्रभाकर पांडे भांडण सोडविण्यासाठी आले. त्यांनाही दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अश्रफ यांचे एरिया सुपरवायजर व सुरक्षारक्षक मेहबूब शेख यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.