ह.भ.प. संभाजी महाराज मोरे यांचं निधन

पिंपरी, प्रतिनिधी : संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज, महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक आणि ‘आकाशाएवढा’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कीर्तनकार ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहूकर (वय ७६) यांचे आज (२६ जून) निधन झाले. संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मोठं काम संभाजी महाराज मोरे यांनी हाती घेतले होते. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही त्यांनी काम केले होते. ते आषाढी वारी पालखी सोहळा प्रमुख होते. संभाजी महाराज मोरे यांची अनेक कीर्तनं यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
२००९ मध्ये महाबळेश्वर येथील ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांनी लिहिलेल्या संतसूर्य तुकाराम या विकृत कादंबरीतून तुकाराम महाराज यांचे चारित्र्य हनन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागितला होता. तसेच ही कादंबरी मागे घेण्यासाठी पाठपुरावाही केला. त्यामुळे ही कादंबरी लेखकाला आणि प्रकाशकाला मागे घ्यावी लागली. समस्त वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या म्हणून डॉ. आनंद यादव यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि अध्यक्षांशिवाय महाबळेश्वर येथील २००९ चे साहित्य संमेलन घेण्याची नामुष्की ओढवली होती.
आळंदी येथील माऊलींच्या समाधी गाभाऱ्याचे बांधकाम संत तुकाराम महाराजांनी केले असल्याचे पुरावे सादर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी फलक लावण्यासाठी हभप जयसिंग मोरे यांच्या सहकार्याने संभाजी महाराज मोरे यांनी आग्रही काम केले. संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना संभाजी महाराज मोरे यांच्या निधनानं संपूर्ण राज्यभरात वारकऱ्यांवर शोककळा पसरली आहे. आषाढी वारी सोहळ्यासाठी सजलेली देहूनगरी दुःखात बुडाली आहे. इंद्रायणी काठी, श्री क्षेत्र देहू या ठिकाणी आज २६ जून २०२४ रोजी दुपारी १ वाजता अंत्यविधी होणार आहे.