हमास प्रमुख इस्माईल हनियाची तेहरानमध्ये हत्या

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचं होतं. मात्र, आता एक मोठी बातमी समोर आली असून इराणच्या तेहरानमध्ये हमासचा प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने एका निवेदनात यासंदर्भात माहिती दिली आहे.
तेहरानमधील इस्माईल हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या स्फोटात हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्यांच्या एका रक्षकाचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. इस्माईल हानियाच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात इस्माईल हानिया आणि त्याच्या एका रक्षकाच्या मृत्यूला हमासने इस्रायलला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
याबाबत ‘आयआरजीसी’ने सांगितले की, हा हल्ला बुधवारी सकाळी झाला. याची आता चौकशी सुरु असून आयआरजीसीने याबाबत दुःख व्यक्त केलं. तसेच हमासने हानियाच्या मृत्यूसाठी इस्रायलला जबाबदार धरलं आहे. हमासचा प्रमुख इस्माईल हानियाच्या हत्येला इस्रायल जबाबदार असल्याचं हमासने म्हटलं आहे. मात्र, याबाबत इस्रायलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इस्माईल हानिया कोण आहे?
इस्माईल हानियाचा जन्म १९६२ मध्ये गाझा पट्टीत झाला. पॅलेस्टिनी नेता म्हणून इस्माईल हानियाला ओळखलं जात होतं. २०१७ मध्ये हमासचे राजकीय ब्युरो म्हणून निवड करण्यात आली होती.