स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेची दंडात्मक कारवाई!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत तब्बल २८ लाखांचा दंड वसूल
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या कठोर भूमिकेअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू ठेवली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात एकूण २८ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी तसेच, स्वच्छता विषयक नियमांचे पालन व्हावे यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
या मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सलगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, तानाजी नरळे, किशोर ननावरे, अतुल पाटील, पूजा दूधनाळे यांच्या नेतृत्वाखाली सहा. आरोग्य अधिकारी राजू साबळे, सुधीर वाघमारे, तानाजी दाते, शांतराम माने, राजेश भाट, किशोर दरवडे, महेश आढाव, अंकुश झिटे मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक,सहा. आरोग्य निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
स्वच्छता नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंड वसूल
उघड्यावर कचरा टाकणे ,ओल्या-सुक्या कचऱ्याचे विलगीकरण न करणे, प्लास्टिक वापर, दुकानदारांकडे दोन डस्टबिन नसणे ,सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे अशा विविध उल्लंघनांवर कारवाई करत संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहराची स्वच्छता ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी स्वच्छता विषयक नियमांचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू राहील. — डॉ. प्रदीप ठेंगल ,उप आयुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

