फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
क्रीडा देश विदेश

बीसीसीआयकडून अंशुमन गायकवाड यांना १ कोटीची मदत

बीसीसीआयकडून अंशुमन गायकवाड यांना १ कोटीची मदत

नवी दिल्ली : १९८३ साली भारताला विश्वचषक जिंकून देणारे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी लढा देत आहेत. त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मदत करावी, अशी मागणी माजी कर्णधार कपिल देव यांनी केली होती. त्यानंतर आता अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी बीसीसीआयने मदतीचा हात पुढे केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कर्करोगाशी लढा देत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कॅन्सरशी झुंज देत असलेले भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तेथील उपचार घेऊन गायकवाड आता बडोदा येथे परतले आहेत. कपिल देव यांनी अंशुमन गायकवाड यांच्या मदतीसाठी त्यांची पेन्शन दान करण्याचा निर्णय घेतला होता. मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांनीही आपल्या सहकारी खेळाडूंना मदतीचा हात पुढे केला आहे. मात्र विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयकडे मदतीची विनंती केली होती. अखेर बीसीसीआयने कपिल देव यांच्या मागणीची दखल घेतली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कर्करोगाशी लढा देत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जय शहा यांनी तसे निर्देश बीसीसीआयला दिले आहेत. तत्पूर्वी जय शहा यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत घोषित केली. अंशुमन गायकवाड यांनी १९७४ ते १९८५ या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत ४० कसोटी सामन्यांत १९८५ धावा केल्या. यामध्ये २ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी २०.६९च्या सरासरीने २६९ धावा केल्या. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.

कपिल, गावस्कर निधी उभा करणार

रक्ताच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्या अंशुमन गायकवाड यांच्यासाठी निधी उभा करण्याकरिता आता माजी कर्णधार कपिल देव आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद हे कॉर्पोरेट कंपन्यांकडून पैसा जमा करणार आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"