पोलिस शिपाई पदांसाठी भरती सुरू

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलाच्या आस्थापनेवरील २६२ पोलिस शिपाई पदांसाठी भरती सुरु आहे. भरतीची लेखी परीक्षा आज रविवारी सकाळी दहा वाजता ताथवडे पुणे येथील श्री बालाजी विद्यापीठ येथे झाली.
या जागांसाठी सुमारे तीन हजार उमेदवार लेखी परीक्षा देणार आहेत. लेखी परीक्षेसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यांची राहण्याची सोय केली.राज्यात नऊ हजार ५९५ पोलीस शिपाई पदे, एक हजार ६८६ चालक पोलीस शिपाई पदे, चार हजार ४४९ सशस्त्र पोलीस शिपाई पदे, १० बॅंण्डसमन पदे, एक हजार ८०० कारागृह पोलीस शिपाई पदांची भरती सुरु आहे.
यापैकी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात २६२ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी ७९, पदे, महिला ७८ पदे, खेळाडू १५ पदे, प्रकल्पग्रस्त १४ पदे, भूकंपग्रस्त ४ पदे, माजी सैनिक ४१ पदे, अंशकालीन पदवीधर ११ पदे, पोलीस पाल्य ७ पदे, गृहरक्षक दल १३ पदे, अनाथ ३ पदे राखीव आहेत.
भरती प्रक्रियेत प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १ः१० प्रमाणात उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावले आहे. त्या उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. ४० टक्क्यांहून कमी गुण मिळवणारे उमेदवार अपात्र समजले जातील.
पोलिसांचे चोख नियोजन
लेखी परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. परीक्षा केंद्रावर योग्य बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत वरिष्ठ लक्ष ठेवून आहेत.