पुणे – मुंबईत अतिमुसळधार पाऊस

पुणे, प्रतिनिधी : काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने आज सकाळपासून पुणे-पिंपरी चिंचवड तसेच मुंबई आणि परिसरात दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत ढगाळ वातावरणसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत ढगाळ वातावरणसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, पुणे मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवस मुंबईत अधून-मधून हलक्या सरी हजेरी लावत होत्या. दिवसभर मळभ आणि तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप असे वातावरण होते. दरम्यान, आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही तासांत पश्चिम आणि मध्य उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुलुंड, कांजूरमार्ग आणि पवई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सध्या मोसमी वारे सक्रिय झाल्याने राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे तसेच पश्चिम बंगालजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अरबी समुद्रात सौराष्ट्रलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम आहे आणि दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपट्टीवर समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून सध्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.