पिंपरी -चिंचवड विद्यापीठात शैक्षणिक करार

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि इंडो थाई न्यूज चॅनेल यांच्यामध्ये शिक्षण विषयक सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या नवी दिल्लीतील विभागीय कार्यालयात हा करार झाला.
यावेळी आसामचे खासदार कृपानाथ मल्लाह, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सहसचिव ॲड. रोहित पांडे, कायदे सल्लागार ॲड. पीटर फर्नांडिस, पीसीईटीचे माध्यम सल्लागार डॉ. राजेंद्र वाघमारे, हाँगकाँग मधील प्रसिद्ध उद्योगपती लिओ चॅन, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
इंडिया-थाई चेंबर ऑफ कॉमर्स (आयटीसीसी) ही थाई आणि भारतीय सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्था आहे. हा सामंजस्य करार नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि माध्यम संधींना चालना देण्याच्या उद्देशाने एका भागीदारीची सुरुवात करतो. यामुळे इंटर्नशिप आणि जागतिक शैक्षणिक संस्था, व्यक्ती यांच्या बरोबर आंतरराष्ट्रीय संधींसह पीसीयुच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक अनुभव ही मिळेल. पीसीयु स्कूल ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन्समधील विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी, प्रत्यक्ष अनुभव आणि वास्तविक जीवनातील केस स्टडी अभ्यासाद्वारे त्यांना मीडिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल माहिती मिळेल, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
हॉंगकॉंग मधील प्रसिद्ध उद्योजक लिओ चॅन यांनी पीसीईटीच्या पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या संशोधन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी डॉ. गिरीश देसाई यांना पीसीयुसाठी उद्योग विनिमय संधी शोधण्यासाठी हाँगकाँगला आमंत्रित केले. तसेच पीसीईटी आणि पीसीयुच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी मिश्रा व डॉ. देसाई यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.