पिंपरी चिंचवडमध्ये डेंगीचे ४६ रूग्ण

पिंपरी, प्रतिनिधी : शहराच्या कार्यक्षेत्रात डेंगीचे ४६, चिकुनगुण्याचे पाच आणि झिकाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. झिकाचे दोन्ही रुग्ण खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिली.
शहरात झिका रुग्ण आढळलेल्या परिसरात सर्वेक्षणासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत परिसरात ताप सर्वेक्षम, कंटेनर सर्वेक्षण आणि गरोदर माता सर्वेक्षण केले जात आहे. डेंगी किवा झिका सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले आहे.
शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिकेने डेंगीमुक्त पीसीएमसी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत हिवताप, डेंगी, चिकुनगुण्या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली. किटकजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या अनुषंगाने डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कचऱ्याची व भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे याबाबत आवाहन करण्यात आले. पथनाट्य, प्रभातफेरी उपक्रम राबविण्यात आली.चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्र येथे झालेल्या या उपक्रमात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. किशोरी नलावडे तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी भाग घेतला.
शहरातील प्रत्येक नागरिकाने प्रत्येक आठवड्यातील एक दिवस एक तास मोहीम राबवावी. त्याअंतर्गत दर रविवारी सकाळी नऊ ते दहा वेळ राखून ठेवावी. या कालावधीत आपल्या घरातील आतील व बाहेरील पूर्ण परिसराचे परीक्षण करावे. पाणी साठणारी (डोसोत्पत्ती) सर्व ठिकाणे नष्ट करावीत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.