पिंपरीत डेंग्यूचे १० रुग्ण

पिंपरी, प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या आता दहावर गेली असून त्यात ५ पुरुष आणि ५ महिला रुग्ण आहेत. त्यापैकी ९ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आलेले असून उर्वरित एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजुस दुखणे. अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे. त्वचेखाली, नाकातुन रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे. काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो या गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यु शॉक सिंड्रोम असे म्हणतात. यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते.
डेंग्यू टाळता येतो का?
डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती घरांमध्ये आणि आजूबाजूच्या कंटेनरमध्ये साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डेंग्यू हा संसर्गग्रस्त मादी एडिस डासांच्या चावण्यामुळे होतो. संक्रमित डासाच्या एकाच चाव्यामुळे डेंग्यू होऊ शकतो. डेंग्यूचे डास दिवसा चावतात.
वैद्यकीय विभाग काय कार्यवाही करते?
वैद्यकीय विभागामार्फत किटकजन्य आजार रोखण्याकरिता खालील ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या व खाजगी शाळा, महाविद्यालये,. बांधकामाची ठिकाणे, विविध खाजगी दवाखाने व रुग्णालये. झोपडपट्टी व झोपडपट्टी सदृश ठिकाणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विविध कार्यालये, नागरी आरोग्य व पोषण दिन ठिकाणे, जनजागृती करिता एकूण ५ लक्ष हस्त पत्रके छापण्यात आलेली आहेत व त्यांचे वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे.
काय काळजी घ्याल?
- एडिस इजिप्ती या डासांची पैदास रोखण्यासाठी सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनर चांगल्या प्रकारे बसवलेल्या झाकणाने झाकून ठेवा.
- डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी दर आठवड्याला कूलर, फ्रीजखालील ट्रे मधील पाणी रिकामे करावे.
- डासांचा प्रवेश रोखण्यासाठी दारे आणि खिडक्यांवर वायरची जाळी लावा.
- सर्व न वापरलेले कंटेनर, रद्दीचे साहित्य, टायर इत्यादींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
- डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फुलदाण्यातील, कुंड्यांतील पाणी दर आठवड्याला बदलावे.
- एक आठवड्यापेक्षा जास्त काळ घर बंद ठेवणार असाल टर टॉयलेट सीट झाकून ठेवा.
या गोष्टी आवर्जून करा
- डास चावण्यापासून वाचण्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
- एडिस डास चावण्यापासून बचाव करण्यासाठी मॉस्किटो रिपेलेंट्स वापरा
- डेंग्यू तापाच्या वेळी डास चावण्यापासून रोखण्यासाठी घरी आणि रुग्णालयात बेडनेट वापरा
- दिवसा एरोसोल, व्हेपोरायझर्स (कॉइल/मॅट्स) वापरा
- ताप आल्यास पॅरासिटामॉल, भरपूर द्रव आणि विश्रांती घ्या
- घरात पाणी साठविण्याची सर्व भांडयातील पाणी वापरुन रिकामी करुन घासून/ पुसून कोरडी करावयाची आहेत व त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावयाचे आहे.
- घराभोवतीच्या पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणे पाणी वाहते केले जाईल याबाबत दक्षता घेणे.
- शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंन्ट पाईपला जाळया बसविणे.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
ऍस्पिरिन ची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका. डेंग्यू तापाच्या बाबतीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णालयात दाखल करण्याचा आग्रह धरू नका, कारण डेंग्यूच्या अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते डेंग्यू आजाराचा रुग्ण निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचाच पॉझिटीव्ह अहवाल आवश्यक आहे. कोणत्याही रॅपीड किटचा अहवाल निश्चित निदानासाठी ग्राह्य धरण्यात येत नाही.