पिंपरीत डेंगीचे पाच रुग्ण

पिंपरी, प्रतिनिधी : पावसाळा सुरू होताच शहरात डेंगीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यःस्थितीत पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.
शहरात जूनपासून आत्तापर्यंत डेंगीचे पाच रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार रुग्णांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित एकावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. डेंगी टाळता येऊ शकतो. त्यासाठी काही उपाययोजना गरजेच्या आहेत, असे आरोग्य वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे. डेंगीच्या डासांची उत्पत्ती घरांमध्ये आणि आजूबाजूच्या कंटेनरमध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. हा आजार संसर्गग्रस्त मादी एडीस डासांच्या चावण्यामुळे होतो. हे डास दिवसा चावतात, याकडे लक्ष वेधले आहे.
यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, डेंगीच्या रुग्णाच्या निश्चित निदानासाठी सेंटीनल सेंटरचा पॉझिटिव्ह अहवाल आवश्यक आहे. रॅपिड किटचा अहवाल ग्राह्य नाही. डेंगीचा प्रसार रोखण्यासाठी वेळीच खबरदारी आवश्यक आहे. डासोत्पत्तीच्या स्थानांवर नियंत्रण गरजेचे आहे.
कूलरचे जुने गवत पुढील हंगामात वापरू नका. डेंगीचे निदान करण्यासाठी केवळ प्लेटलेटच्या संख्येवर अवलंबून राहू नका. डेंगीच्या तापावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. स्व-औषध टाळावे. डॉक्टरांचा सल्ला घ्या. एँस्पिरिनची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना
- पाण्याच्या टाक्या, कंटेनर झाकून ठेवणे
- कुलर, फ्रीजखालील ट्रेमधील पाणी रिकामे
- कंटेनर, टायरची योग्य विल्हेवाट
- मॉस्किटो रिपेलेंटस् वापर करणे
- पिण्याच्या पाण्याची भांडी पुसून कोरडी
- फुलदाणी, कुंड्यांतील पाणी वारंवार बदलणे
- घराभोवतीच्या पाण्याची डबकी बुजविणे
डेंगी आजाराची लक्षणे
- तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी
- स्नायू दुखी, सांधे दुखी
- उलट्या येणे, डोळ्यात दुखणे
- अंगावर पुरळ, अशक्तपणा
- भूक मंदावणे, तोंडाला कोरड
- नाकातून रक्त, पोट दुखणे
- रक्तजलाचे प्रमाण कमी होणे