पावसाळ्यात काय खावं?

पावसाळ्यात घराबाहेरचं वातावरण पाहिलं तर प्रत्येकालाच काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. बाहेर असाल तर वडापाव, भजी, मक्याचं कणीस आणि जोडीला आल्याचा चहा, कॉफी यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. तर घरात असलेल्यांकडूनही अशाच काहीशा पदार्थांची मागणी केली जाते. मग जेवणाच्या ताटाबरोबर गरम सूप असेल तर जेवणाची लज्जत आणखी वाढते. पण या बदलत्या हवेत आरोग्य सांभाळताना नेमके कोणते पदार्थ आहारात समाविष्ट करावे, आणि कोणते पदार्थ टाळावेत, हे जाणून घेऊया.
सहसा पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या टाळ्याव्यात असं सांगितलं जातं. चिखल माती लागल्यामुळे त्या लवकर खराब होतात. तसंच पालेभाज्यांमध्ये पाण्याचा अंश आगोदरच जास्त असतो. त्यातच जर त्या पावसात भिजल्या तर लवकर कुजतात. त्यामुळे भाजी खराब होऊन जाते. विकत घेण्यायोग्य आणि तरीही स्वच्छ वाटल्यास खरेदी केली तर ती फार काळ न ठेवता लगेच करून खावी लागते. अन्यथा ती खाण्यायोग्य राहात नाही. याशिवाय आळ्या, किडे यांची पैदास होऊ शकते, अशा फळभाज्या सुद्धा या दिवसात टाळायला हव्यात. मग नेमकं काय खावं, याची माहिती या लेखात सविस्तर वाचा.
तळलेले पदार्थ, सूप आणि भाजी
पावसाळा आणि मक्याचे कणीस, भजी यांचे वेगळे नाते जनमानसात रुजलेले आहे. एखाद्या दिवशी तळलेल्या पदार्थांचा बेत असेल तर मुळात प्रमाणात खाणं आणि पुढच्या जेवणात भाज्यांचं सूप किंवा भरपूर भाजी असणारा आहार घेणं महत्वाचं आहे. याचाच अर्थ जरी चमचमीत खावंसं वाटलं तर त्यानंतरचा आहार या चमचमीत खाण्याला कसा संतुलित करेल, हे पहायला हवं.

हळद आवश्यक
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळदीचे दूध पिणे उत्तम. शक्यतो रात्री झोपताना हळद-दूध प्यायल्यास उत्तम झोप लागू शकते. ज्यांना हॉर्मोनल / शारीरिक ग्रंथींचे विकार आहेत त्यांनी रात्री झोपताना गरम पाण्यातून एक चिमूट हळद एकत्र करून हे पाणी नक्की प्यावे.
कोबी, फ्लॉवर टाळा
पावसाळ्यातील भाज्या कोणत्या खाव्यात हा प्रश्न पडणं साहजिक आहे. पावसाळ्यात शक्यतो काकडी, मुळा , भेंडी , तोंडली, गाजर ,बीट यांचे आहारातील प्रमाण वाढवावे . पालेभाज्या चोखंदळ निवडाव्यात. शक्यतो कांद्याची पात, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाज्या कमी खाव्यात. यातील पाण्याचे प्रमाण संसर्गजन्य रोगांचे प्रमाण सोबत घेऊन येतं. त्यामुळे या भाज्या न खाणे उत्तम.
लसूण आहारात हवा
हिरव्या लसूणपातीचा पराठा, मिरची- लसूण ठेचा, लसूण चटणी यांना भारतीय आहारात महत्वाचे स्थान आहे. पावसाळ्यात विशेषतः तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असल्यास आहारात लसूण जरूर समाविष्ट करावी. शरीरातील चयापचय क्रिया वाढविणारे आणि रोगप्रतिकारशक्ती शाबूत राखण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी आहे.
मसाला चहा
भारतीय मसाल्यांचे- त्यातील योग्य मसाल्याच्या पदार्थांचे योग्य प्रमाणात मिश्रण चहासोबत एकत्र करून आपला नेहमीच चहा आणखी आरोग्यदायी ठरू शकतो . विशेषतः त्यात साखरेचे प्रमाण शून्य ठेवणे केव्हाही उत्तम. उदाहरणार्थ चहामध्ये आलं , वेलदोडे , बडीशेप, दगडफूल, चहाची पात, गुलाबाच्या पाकळ्या यासारखे पदार्थ एकत्र केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास आणि पावसाळ्यातील चहाची तल्लफ पूर्ण होण्यास मदत होते.
मक्याचे कणीस
पावसाळा आणि मक्याचे कणीस यांचं जवळच नातं आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यासोबत एक वाटी उकडलेली कडधान्ये जरूर खावीत. मक्याचे भाजलेले कणीस खाताना अतिरिक्त मीठ आणि मसाले टाळावेत. गोडसर चवीचे कणीस एका वेळी तुम्हाला भरपूर प्रमाणात कर्बोदके देऊ करते, त्यामुळे आहारात कणीस असल्यास इतर पदार्थ प्रथिनांनी भरपूर असणे आवश्यक ठरते.