पाणी ओसरल्यावर शहरात स्वच्छता मोहीम

पिंपरी, प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे आणि नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने पुरग्रस्त तसेच सखल भागात पाणी साचले होते. हे पाणी ओसरल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पूरबाधित परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूरबाधित परिसरांमधील पाणी ओसरल्यानंतर शहरातील विविध भागात तसेच नदीकाठच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.
या व्यतिरिक्त, पूरग्रस्त भागात महापालिकेच्या वतीने वैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. त्यामध्ये नागरिकांना विविध औषधोपचार पुरविणे, पावसामुळे सर्दी, खोकला, ताप इतर आजाराने ग्रस्त नागरिकांचा रक्त नमुना तपासून त्यांच्यावर योग्य औषधोपचार करणे अशा वैद्यकीय सुविधा तत्परतेने पुरविल्या जात आहेत. तसेच महापालिकेच्या विविध निवारा केंद्रांमध्ये वैद्यकीय पथके तैनात असून पूरग्रस्त रहिवाशांची आरोग्य तपासणी तसेच आवश्यक औषधोपचार करण्यात येत आहे.
महापालिकेकडून काय कामे सुरू आहेत?
शहरातील विविध भागात रस्त्यावरील चिखल साफ करणे, तुंबलेल्या चेंबरची स्वच्छता करणे, नदीकाठी जमा झालेल्या कचरा तसेच गाळ जेसीबीच्या सहाय्याने हटविणे, माती साचलेल्या ठिकाणी पाणी फवारणी करून स्वच्छता करणे, विविध ठिकाणी तसेच पुरबाधित भागात निर्जंतुकीकरण करणे तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन आणि आदी व्यवस्था करणे, चिखलाने माखलेला परिसर पाण्याच्या फवाऱ्याने स्वच्छ करणे, नदीकाठच्या परिसरात अडकलेला कचरा व पाने-वेली हटविणे अशी विविध कामे तातडीने करण्यात येत असून संध्याकाळी उशिरापर्यंत ही कामे सुरु आहेत.
प्रामुख्याने कुठे स्वच्छता सुरू आहे?
शहरात प्रामुख्याने शहरातील डुडुळगाव स्मशानभूमी, बोपखेल रामनगर, बोपखेल स्मशानभूमी, गव्हाणे घाट पिंपळे निलख गावठाण, दत्त मंदिर घाट पिंपळे सौदागर, संजय गांधी नगर, पिंपरी वाघेरे तसेच शहरातील नदीकाठी घाट परिसर, स्मशानभूमी आदी परिसरांचा समावेश आहे.
महापालिकेचे नागरिकांना आवाहन
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पिण्याच्या पाण्यातून जलजन्य रोगांचा प्रसार होण्याची दाट शक्यता असते. दक्षतेचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या इमारतीमध्ये असलेल्या जमिनीखालील व इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई करुन घ्यावी व पाण्याच्या टाकी सभोवतालची जागा स्वच्छ ठेवावी. आरोग्याच्या दृष्टीने दक्षतेचा उपाय म्हणून घरगुती वापरामध्ये पिण्यासाठी वापरात येणारे पाणी उकळून व गाळून घेण्यात यावे. ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रसार होणे टाळता येईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.