पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण!

पीटीआय , नवी दिल्ली : महिलांचं व त्यांच्या हक्कांचं संरक्षण हा मुद्दा भारतात अनेकदा चर्चेला येतो. पण भारताप्रमाणेच जगभरातल्या महिलांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. पाकिस्तानमधील एका तरुणीनं नुकतीच तिच्या एक्स हँडलवर केलेली पोस्ट याच कारणामुळे व्हायरल होत आहे. या तरुणीने केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. “पाकिस्तानमध्ये एक मुलगी म्हणून जगणं कठीण आहे. हा देश म्हणजे नरक झालाय”, असं या तरुणीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. घडलेला सगळा प्रकार विशद करतानाच मोबाईल चॅटचे काही स्क्रीनशॉट्सही तिने शेअर केले आहेत.
ही पोस्ट अदिना हिरा नावाच्या एका तरुणीने केली आहे. २३ जुलै रोजी या तरुणीने तिच्या अधिकृत एक्स हँडलवर ही पोस्ट केली असून त्यासोबत काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत. पाकिस्तानमध्ये नोकरीसाठीच्या एका वेबसाईटवरील जाहिरातीसाठी तिने अर्ज केला होता. पण त्यानंतर आलेला भयंकर अनुभव या तरुणीने तिच्या पोस्टमध्ये सांगितला आहे. शिवाय, चॅट करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरसह या तरुणीने हे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
पाकिस्तानमधील गिगा ग्रुप ऑफ कंपनीजसाठीची ही जाहिरात होती. या कंपनीमध्ये नव्याने पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याचं जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. त्यानुसार अदिना हिरा हिने अर्ज केला. त्यानंतर सादम बुखारी नावाच्या एका व्यक्तीने त्याच संकेतस्थळावर तिच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. त्याने अदिनाला कामाचं स्वरूप समजावून सांगितलं. या संवादाचे स्क्रीनशॉट अदिनानं तिच्या एक्स पोस्टमध्ये शेअर केले आहेत.