पवना धरणातला पाणीसाठा ८८ टक्के

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरण परिसरात पावसाची संततधार कायम आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या धरणक्षेत्रात ८७.६८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. धरणातील पाणीसाठा १७ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची भिती व्यक्त केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वेगाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. हा साठा १० ते ११ महिने पुरेल एवढा आहे. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.