पॅरिस: पॅरिस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतानं तिसऱ्या पदावर अचूक निशाणा साधला आणि स्वप्निल कुसाळेच्या कामगिरीमुळे कास्य पदक नेमबाजीतलं कास्य पदक भारताकडे आले.
ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी वरचढ कामगिरी दाखविली आहे. आजच्या दिवसात नेमबाज स्वप्निल कुसाळेनं तर इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्निलनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्याने एकूण ४५१.४ गुण मिळवत कास्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही नेमबाजाला पदक जिंकता आलेलं नव्हतं. पण स्वप्निलनं स्वप्नवत कामगिरी करत भारतीय नेमबाजांचा पदक दुष्काळ संपवला. भारताला यंदा आतापर्यंत मिळालेली तीनही पदकं नेमबाजांनी मिळविली आहेत.
कसे मिळवले स्वप्निलनं गुण?
अंतिम फेरीत नीलिंग आणि प्रोन सीरिज संपल्यानंतर २९ वर्षांच्या स्वप्निल कुसाळे ३१०.१ गुणांसह पाचव्या स्थानी होता. पण स्टँडिंगच्या दोन सीरिजमध्ये त्यानं दमदार कामगिरीसह पुनरामगन केलं. या सीरिजनंतर स्वप्निल तिसऱ्या क्रमांकावर आला. त्यांनी हेच स्थान कायम राखत पदकाला गवसणी घातली. नीलिंगमध्ये नेमबाजांना गुडघ्यावर बसून लक्ष्यभेद करावा लागतो. प्रोन प्रकारात जमिनीवर झोपून निशाणा साधावा लागतो. तर स्टँडिंगमध्ये उभं राहून लक्ष्य भेदावं लागतं.
नीलिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलनं ५०.८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सीरिजमध्ये त्यानं ५१.९ गुण कमावले. तर तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.६ गुण मिळवले. प्रोनच्या पहिल्या सीरिजमध्ये ५२.७, दुसऱ्या सीरिजमध्ये ५२.२ आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.९ गुण मिळवले. स्टँडिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलच्या खात्यात ५१.१, तर दुसऱ्या सीरिजमध्ये ५०.४ गुण जमा झाले. स्टँडिंगच्याच दोन सीरिजच्या जोरावर स्वप्निलनं बाजी मारली.
कोल्हापूरच्या मातीनं घडवला इतिहास
कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या स्वप्निलनं पात्रता फेरीत ६० शॉट्समध्ये ५९० गुण मिळवले होते. नीलिंग पोझिशनमध्ये त्यानं ९९ गुणांसह सुरुवात केली. त्यानंतर प्रोनमध्ये ९८ आणि ९९ गुण मिळवले. स्टँडिंगमध्ये ९८ आणि ९७ गुणांची कमाई करत त्यानं अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत कांस्य पदकाची कमाई करत स्वप्निलनं स्वप्नवत कामगिरी सुरुच ठेवली आहे.