जंक फूडमुळं आयुर्मान होतंय कमी?

चमचमीत, खमंग, लज्जतदार, टेम्टिंग असे शब्द ऐकले तरी तोंडाला पाणी सुटेल. या वर्णनाचे पदार्थ म्हणजे अर्थातच मोमोज, पिझ्झा, बर्गर, चायनिज अशा गटात मोडणारे आणि जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ असतात. खमंग आणि लज्जतदार पदार्थ घरच्या जेवणात मिळतात पण बाहेर विकत मिळणारे पदार्थ अधिक आकर्षक आणि चविष्ट वाटतात. मग जिभेचे लाड पुरवावेत की पोटाची गरज ओळखावी, या द्विधा मनस्थितीत असताना आपण बऱ्याचदा जिभेचं ऐकतो. जिभेची मागणी पुरवली तर त्याचा पोटावर विपरित परिणाम होतो हे निश्चितच आहे. पण जिभेचे चोचले जीवघेणे ठरू शकतात, याचा कधी विचार केला आहे का?
पिझ्झा, बर्गर, ब्रेड, नूडल्स असं कोणत्याही प्रकारचं जंक फूड आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण आता एका अभ्यासातून या विधानाला अधिक बळकटी मिळाली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका मोठ्या संशोधनपर अभ्यासात असं आढळलं आहे की, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळं लोकांचं आयुर्मान कमी होऊ शकतं आणि मृत्यू लवकर होण्याचा धोका वाढू शकतो.
हा अभ्यास ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी 34 वर्षांपर्यंत जवळपास 44 हजार ज्येष्ठ नागरिकांच्या आहाराचा, आरोग्याचा अभ्यास केला आहे. अभ्यासादरम्यान, सहभागींनी सेवन केलेल्या अन्नाची सविस्तर माहिती घेण्यात आली. त्यात असं आढळलं की, प्रोसेस्ड फूड खाण्याची सवय असलेल्यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका अधिक आहे.
अध्ययनाच्या मर्यादा
अभ्यसकांचं म्हणणं आहे की, हे एक परीक्षण करण्यात आलं होतं. यातून हे सिद्ध होत नाही की मृत्यू लवकर येण्याचं कारण हे अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच असू शकेल. पण अभ्यासातून आलेला निष्कर्ष मात्र ठाम संकेत देतो, की या पदार्थांचं सेवन कमी करणं हेच आरोग्यासाठी हितकारक असू शकतं.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडबद्दल संशोधन काय सांगतं?
संशोधनाद्वारे सांगण्यात आलं आहे की, पदार्थाच्या मूळ रूपापेक्षा त्यात बऱ्याच प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये साधारणपणे मीठ, साखर,चरबी आणि आर्टिफिशिअल घटकांचं प्रमाण जास्त असतं. उदाहरणार्थ पॅकेज्ड स्नॅक्स, डबाबंद पदार्थ, नूडल्स, इंस्टंट सूप, कोल्डड्रिंक इत्यादी पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या गटात मोडतात.