काय आहेत गुळाच्या चहाचे फायदे?

आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचं सेवन आपण अगदी सर्रास करतो. परंतु, जसजसे लोक आरोग्याविषयी जागरूक होऊ लागले, आहेत, तसतसे सगळ्यांनीच आपल्या आहारातून साखरेचे प्रमाण कमी करण्यास प्रारंभ केला आहे. दिवसाची सुरुवात आपण चहानेच करतो आणि इथेच साखर पोटात जायला सुरूवात होते. त्यामुळे हीच सुरुवात जर अधिक आरोग्यदायी करायची असेल, तर त्यासाठी चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करायला हवा. काय आहेत नेमके गुळाच्या चहाचे फायदे, हे जाणून घेऊया.
साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत. अतिप्रमाणात साखर खाल्ल्याने ती शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून साखरेसाठी पर्याय म्हणून गुळाचा, मधाचा वापर केला जातो. त्यामुळे अनेक जण हल्ली गुळाच्या चहाला पसंती देतात. भारतात जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात दिवसातून कमीत कमी एकदा तरी चहा केला जातो. जगभरात लोकप्रिय असलेलं पेय म्हणून चहाचा दर्जा आहे. त्यातल्या त्यात भारतात चहाप्रेमींची संख्या जरा अधिकच आहे. परंतु, दररोज साखरेचा चहा घेतल्याने त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात, म्हणून साखरेऐवजी गुळाचा चहा घेणं सगळ्यांच्या फायद्याचंच ठरतं.
अनेकदा दुधाचा चहा करताना दूध नासतं आणि त्यामुळे सगळा चहा खराब होतो, म्हणून पुन्हा पुन्हा आपण तसा चहा करणे टाळतो. मात्र, ही पद्धत नीट समजून घेतल्यानंतर चहा केल्यास हा गुळाचाच चहा प्रत्येकाला प्यावासा वाटतो.
काय आहेत गुळाचे फायदे?
- शरीर उबदार ठेवते
- गुळात लोह, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात
- सर्दी आणि फ्लूपासून संरक्षण
- गूळ रक्त शुद्ध करते
- वजन कमी करण्यास मदत
- शरीरातील ऊर्जा कायम राहते