उचकी लागली? हे करून पाहा!

जेवताना उचकी लागण्याचा त्रास अनेकांना होतो. काही वेळा जेवत नसताना सुद्धा उचकी लागते. काही जणांच्या बाबतीत एकदा लागलेली उचकी खूप वेळ थांबतही नाही. आणि मग जीव कासाविस होतो. काय करावे, समजत नाही. त्यावर काही घरगुती उपाय आज सांगणार आहोत. हे सगळे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात. आणि उचकी थांबण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात. एकदा करून पाहा.
उचकी लागल्यास सर्वप्रथम दीर्घ श्वास घ्यावा आणि काही सेकंद तो रोखून धरावा. तसं केल्यानं फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याचा प्रयत्न करेल. यामुळं उचकी आपोआप थांबेल.
उचकी लागल्यावर लगेच एक चमचा साखर खाऊन पाहा. साखरेमुळं लाळ तयार होते. आणि श्वसननलिकेत निर्माण झालेल्या हवेच्या पोकळीमुळे जी उचकी लागते, ती थांबण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. काही जण सांगतात की, साखरेच्या पाण्यात थोडं मीठ घालून ते थोडं थोडं प्यायलं तरीही उचकी थांबू शकते.
उचकी थांबण्यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून ते मिश्रण चाटावं, असा काही जणांचा अनुभव आहे. यामुळे सुद्धा उचकी थांबण्यास मदत होऊ शकते.
जेवत असताना बऱ्याचदा भरभर खाल्ल्यामुळे उचकी लागते. त्यामुळे सगळ्यात आधी हळू जेवण्याची सवय लावू घ्यावी. प्रत्येक घास चावून खावा. म्हणजे तो अन्ननलिकेत अडकत नाही किंवा उचकी लागत नाही.
पाण्यात मीठ टाकून प्यायले तरीही उचकी थांबू शकते. याखेरीज स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात असलेल्या तीन काळी मिरीचे दाणे आणि खडीसाखर तोंडात ठेवून चावावी आणि त्याचा रस प्यावा. मग त्यावर एक घोट पाणी प्यावं. यामुळं उचकी बंद होईल. किंवा उचकी आल्यावर लगेचच टोमॅटो चावून खा. एक चमचा पीनट बटर खावं. यामुळं श्वास घेण्याच्या प्रक्रियेत बदल होऊन उचकी बंद होईल.