अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ; महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नोटिसा

पिंपरी : विविध भागातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, हॉटेल, पब आणि बारवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, सहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह नऊ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना , इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. नदीकाठी मोठ्या प्रमाणात भराव आणि अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या पावसात नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पाच हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. य पार्श्र्वभूमीवर नदीकाठच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत महापालिका प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कानाडोळा केला जात होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त, सहा क्षेत्रीय अधिकारी, दोन बीट निरीक्षक अशा नऊ जणांना नोटिसा बजावल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी दिली. नदीकाठच्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अशा अतिक्रमणांवर आता कारवाई करायची की पावसाळ्यानंतर, याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात महापालिकेचे आठ क्षेत्रीय कार्यालये आहेत. मात्र सहाच क्षेत्रीय अधिकारी आणि दोन बीट निरीक्षक अशा नऊ जणांना नोटीस दिली आहे. यामध्ये दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अभय दिल्याचे चर्चा आहे .
शहरात कोणत्या भागात अतिक्रमण झाले आहे , किती अतिक्रमण धारकांना नोटीसा दिल्या किती जणांवर कारवाई केली
याची सर्व माहिती व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र उपायोजना विकसित करण्यात येत आहे.