बडोदा : क्रिकेटच्या मैदानात परिस्थितीत कितीही विपरीत असली तरी हार न मानणारे भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू-फलंदाज अंशुमन गायकवाड यांची कॅन्सरशी मात्र झुंज अपयशी ठरली. रक्ताच्या कर्करोगामुळे त्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. अंशुमन गायकवाड यांनी ४० कसोटी व १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याशिवाय अंशुमन गायकवाड यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणूनही भूमिका बजावली.
अंशुमन गायकवाड यांच्यावर लंडनमध्ये गेल्या काही काळापासून रक्ताच्या कर्करोगासाठी उपचार चालू होते. लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये त्यांनी उपचार घेतले. गेल्याच महिन्यात ते भारतात परत आले होते. त्यांच्यावरील उपचारांसाठी बीसीसीआयने नुकतीच एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली होती. त्याशिवाय, १९८३ सालच्या भारतीय विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंनीही उपचारांसाठी त्यांना आर्थिक मदत केली होती.