शालेय विद्यार्थ्यांना दाखवला `चंदू चॅम्पियन`

पिंपरी, प्रतिनिधी : नैराश्यातून बाहेर पडून नव्या उमेदीने जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश देणारे पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांचा संघर्षमयी जीवनप्रवास रेखाटणारा ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.
यावेळी पॅरा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड उपस्थित होते.
पद्मश्री पेटकर यांनी प्रत्यक्ष जगलेल्या आयुष्यातील विविध घटनांचा अंतर्भाव ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटामध्ये दर्शविण्यात आला आहे. त्यांचे कर्तृत्व, विविध खेळांमधील यशस्वी कामगिरी, देशप्रेम, लष्करी सेवेत असतानाचे विविध प्रसंग, पॅराऑलिंपिकमध्ये भाग घेतल्यानंतर विविध खेळांमध्ये केलेली चमकदार कामगिरी तसेच त्यांच्या व्यक्तीगत जीवनात घडलेल्या अनेक घटना यामध्ये पाहायला मिळतात.
भारतीय सैन्यात असताना युद्धात गोळ्या लागून आलेल्या अपंगत्वावर मात करत त्यांनी मिळवलेले उत्तुंग यश चित्रपट पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणते. दोन वर्षे कोमात असणारे आणि मृत्यूशी झुंज देत देशासाठी मनापासून काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा असणारे हे पद्मश्री पेटकर यांची जिद्द पाहून मनात देशप्रेमाची ज्योत पेटते. चित्रपटातील प्रत्येक प्रसंग उत्कंठा शिगेला पोहचवतो. नात्यांतील गुंफ हळुवारपणे उलगडणारा प्रवास अन् प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा चित्रपट मनाला भावतो.
आजची मुले ही उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. त्यांनी नैराशाच्या गर्तेत न जाता आत्मविश्वासाने येणाऱ्या अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करावे. खेळाडूंनी जिद्दीने आपले कर्तृत्व सिद्ध करत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे. सैनिकाच्या जीवनातील संघर्ष या चित्रपटातून जगासमोर आला याचा मला विलक्षण आनंद आहे. यातून सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा पेटकर यांनी या वेळी व्यक्त केली.