शरद पवारांनी उडवली बावनकुळेंची खिल्ली

छत्रपती संभाजीनगर : शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत अमित शहांवर बोलणे, त्यांच्या व्यक्तीमत्त्वावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्या सारखे आहे असे म्हंटले होते. बावनकुळे यांच्या याच विधानाची शरद पवारांनी खिल्ली उडवली आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला आहे असे पवार म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. शिवाय मराठा आरक्षणाबाबत देखील सरकारला सल्ला दिला आहे. याच पत्रकार परिषदेत अमित शहा यांच्यावर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर, तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगात पाहिला होता, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. एका तडीपार व्यक्तीच्या हाती देशाचं संरक्षण आहे. त्यांच्याकडे देशाच्या गृहमंत्रीपदाची सूत्रे आहेत, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला होता.
आरक्षणाबाबत माझी भूमिका सुसंवादाची
याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सुसंवाद करण्याची माझ्या पक्षाची भूमिका असेल. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवावे आणि याप्रकरणी तोडगा काढला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शिवाय आरक्षणप्रकरणी मला एक चिंता वाटत आहे. ती म्हणजे दोन समाजात दरी निर्माण होते की काय असे चित्र आहे. विशेषतः मराठवाड्याच्या दोन ते तीन जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची गरज आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आमच्यासारख्या नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे. सरकारने आता नव्या पिढीशी सुसंवाद करण्याची गरज आहे. याप्रकरणी चर्चा आणि संवाद होणे महत्वाचे असल्याने सरकारने जरांगे, भुजबळ, हाके आणि आम्हाला चर्चेला बोलावले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी उडवली बावनकुळेंची खिल्ली
शरद पवार यांनी यावेळी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही टीका केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पुर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही परिणाम होईल. असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.