मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पिंपरीत शुभारंभ

पिंपरी : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचा शहरातील भगिनींना लाभ मिळण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. भगिनींच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळणे यासाठी शहरात १२३ सुविधा केंद्र, पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली असून गरज असल्यास, त्यात वाढही करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या राज्यशासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील महापालिकेच्या जुन्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला ठेवलेली रहिवासी आणि उत्पन्नाच्या दाखल्याची अट राज्य शासनाने कमी केली असून पिवळ्या अथवा केशरी शिधावाटप पत्रिकेच्या आधारे लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याकरिता लाभार्थीकडे आधार कार्ड असणे अनिवार्य असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. ही योजना राबविणे तसेच योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महिला बचत गटांची मदत घेण्यात येणार असून घरोघरी जाऊन नोंदणी देखील करण्यात येणार आहे.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, योजनेच्या लाभासाठी महापालिकेची ८ क्षेत्रीय कार्यालये, ५७ मनपा शाळा, १७ करसंकलन कार्यालय, तसेच मुख्य चौक, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ यासारखी ४१ शिबीर ठिकाणे येथे सोय करण्यात आली आहे. या योजनेला महिलांचा संभाव्य प्रतिसाद व त्यामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल तसेच ३१ ऑगस्ट पूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे.’