तुमची मुलं या शाळेत नाहीत ना?

पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील ११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी ६ शाळा शिक्षण विभागाने बंद केल्या असून , उर्वरीत ५ शाळांसमोर अनधिकृत शाळा असे फलक लावण्यात आले आहेत. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र या शाळांवर अद्याप फौजदारी कारवाई झालेली नाही.
महापालिकेने अनधिकृत शाळांना दिलेल्या पत्रांकडे शाळा प्रशासनाकडून वारंवार डोळेझाक केली गेली आहे. शिक्षण विभागाने केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेता आतापर्यंत शाळा सुरु ठेवल्या. अशा शाळांच्या बाहेर दर्शनी भागातच अनधिकृत शाळा म्हणून फलक लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जागृती होऊन पालकांनी या शाळेत पाल्याचा प्रवेश करु नये असा उद्देश आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने मे महिन्यातच शहरातील ११ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन वारंवार करण्यात येत होते. या शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाने शाळांसोबत वारंवार पत्रव्यवहार केला. शासन मान्यता नसताना देखील शाळा सुरु ठेवणा-या शाळांबाहेर फलक लावण्यात आले, अशी माहिती शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली.
या शाळेत प्रवेश घेऊ नका..
शिक्षण विभागाच्या वतीने अनधिकृत शाळांची पाहणी करण्यात आली. त्यानुसार शाळा सुरु असलेल्या पाहायला मिळाल्या. यामध्ये पीपल ट्री एज्युकेशन ट्रस्ट(पिंपळे निलख), श्री चैतन्य इंग्लिश मिडीयम स्कुल(पिंपळे निलख), लिटिल स्ट्रार इंग्लिश मिडीयम स्कुल(चिंचवडेनगर), नवजित विद्यालय (वाल्हेकरवाडी), ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुल(चिंचवड) या शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ फलक लावण्यात आले आहेत. सदर शाळा अनधिकृत असून या शाळेत पाल्याचा प्रवेश करु नये. ही शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत घोषित केले आहे. आपण पाल्याचा प्रवेश केल्यास होणा-या नुकसानीस आपण जबाबदार असाल असा मजकूर फलकावर लिहीण्यात आला आहे.
कोणत्या शाळा केल्या बंद?
- क्रिस्टल मॉडर्न स्कुल (वडमुखवाडी)
- एम.एस. स्कुल फॉर किडस(सांगवी)
- किडसजी स्कुल (पिंपळेसौदागर)
- सपलिंग्ज इंग्लिश मिडीयम स्कूल (मोशी)
- आयडीएल इंग्लिश स्कूल (पिंपळेगुरव)
- माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल (कासारवाडी)