खडकवासला धरण ८५ टक्के भरले

पुणे, प्रतिनिधी : पुणे शहराची तहान भागवणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) ८५ टक्के भरले आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे आणि परिसरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुढील २४ ते ४८ तास पावसाचा जोर कायम सुरु राहिला तर खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु केला जाणार आहे. त्यामुळे नदी पात्रात कोणीही उतरू नये. तसेच नदी पात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असतील तर ती हलवण्यात यावी, असे आवाहन खडकवासला पाठबंधारे विभागाने केले आहे.
खडकवासला धरण मुठा नदीवर आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. त्यात पावसाचा जोर मागील काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा देखील वाढला आहे. धरण आज, मंगळवारी सकाळी ८५ टक्के भरले आहे.