काय आहे अजितदादांच्या गुलाबी जॅकेटचा किस्सा?

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या परिधान करत असलेल्या गुलाबी जॅकेटवरून राज्यात चर्चांचं राजकारण सुरु झाले आहे. शरद पवार गटाचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यावरून अजित पवार यांना लक्ष्य केलं आहे. प्रश्न विचारताच अजित पवारांनी पत्रकारांना सुनावलं; म्हणाले, “मी माझ्या पैशाने कपडे खरेदी करतो, तुम्ही…”
मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभा आणि कार्यक्रमांमध्ये गुलाबी रंगाचा वापर प्राध्यान्याने केला जातो आहे. अजित पवारदेखील सातत्याने गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत. यावरून आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुलाबी कॅम्पेनवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली आहे. दरम्यान, या ‘पिंक पॉलिटिक्स’वर आता पवार यांनी भाष्य केलं आहे.
या गुलाबी रंगावरून शरद पवार गटाचे नेते डॉ अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लक्ष्य केलं होतं. “अजित पवार गुलाबी रंगाचे जॅकेट घालतात. यामागे राज्याचं वातावरण गुलाबी करण्याचा त्यांचा मानस असू शकतो. पण तसं होईल असं वाटत नाही, जॅकेट घालून राजकारण होत नाही” असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला होता.
दरम्यान, अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पवार यांनी थेट माध्यमांच्या प्रतिनिधींनाच सुनावलं. मी माझ्या सद्सदविवेक बुद्धीनुसार कपडे घालतो. मी गुलाबी रंगाचे जॅकेट घातला तर तुम्हाला काही त्रास होतो का? मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. मी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे, ते ठरवण्याचा अधिकार माझा आहे. मी माझ्या पैशाने कपडे खरेदी करतो. जे सर्वसाधारण लोक घालतात, त्याच प्रकारचे कपडे मी घालतो. मी ऑड डार्क असं काही घालत नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तुम्ही कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय त्यावर मी काही बोललो का? असा प्रश्नही त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला.