गांजा विक्री प्रकरणी तरुणास दिघीत अटक!

पिंपरी: गांजा विक्री प्रकरणी दिघी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ८७७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (२६ मे) रात्री डुडुळगाव येथे करण्यात आली.
गणेश नागेश लोंढे ( वय २३, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार सुधीर डोळस यांनी याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुळगाव येथील अडबंगनाथ चौकात एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत गणेश लोंढे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४३ हजार ८५० रुपये किमतीचा ८७७ ग्रॅम गांजा आणि ३५० रुपये रोख रक्कम असा एकूण ४४ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

जमीन खरेदीसाठी मदत केल्याने मारहाण!
पिंपरी: जमीन खरेदी करताना मदत केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना (२६ मे) दुपारी रहाटणी येथे घडली.
आकाश रवींद्र भालेराव ( वय ३३, रहाटणी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण देवराम नखाते (वय ४५, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश भालेराव आणि त्यांचा मित्र निखिल नखाते हे छत्रपत्नी शिवाजी महाराज चौकातून पायी चालत घरी जात होते. त्यावेळी आरोपीने दोघांना अडवले. निखिल यांनी आकाश यांना जमीन खरेदीच्या वेळी मदत केल्याच्या कारणावरून आरोपीने आकाश यांना मारहाण केली. तसेच आकाश आणि निखिल यांना जीवे मारण्याची धमकी दिली.